राज्यात लोकसभा निवडणूक 2024 चे दोन टप्पे झाले आहेत. आता मे महिन्यात रखरखत्या उन्हात वार-प्रतिवार सुरु आहेत. महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असे रण पेटले आहे. दस्तूरखुद्द पंतप्रधान महाराष्ट्रात तळ ठोकून होते. त्यांनी सभा घेतल्या आणि गाजवल्या. विरोधकांनी त्यांच्यावर पलटवार केला. राज्यात अमरावती, बारामती आणि सांगली हे मतदारसंघ विशेष चर्चेत आहेत. त्यात सांगलीवरुन महाविकास आघाडीतील काही नेत्यांची धुसफूस दिसून आली. आता सांगलीच्या जागेवरुन शरद पवार यांनी कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला आहे.
सांगलीत मोठी खलबतं
सांगलीची जागा उद्धव ठाकरे गटाला सोडल्याने काँग्रेसमधील काही नेते नाराज आहेत. त्यांनी ही जागा सेनाला दिल्यावर जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी तर आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातच वंचितने पण एक डाव धोबीपछाड टाकला आहे. त्यांनी प्रकाश शेंडगे यांना दिलेला पाठिंबा काढला आणि तो विशाल पाटील यांना जाहीर केला. त्यामुळे सांगलीच्या लढतीत रंगत येणार हे वेगळं सांगायला नको.
नाराजी तर कायम
कोल्हापूर मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज काँग्रेसच्या तिकिटावरुन लढण्यासाठी इच्छुक होते. त्यामुळे ठाकरे गटाने त्यांचा मतदारसंघ काँग्रेसला दिला. तर त्या मोबदल्यात ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा केला. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी दिली. त्यावरुन विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली. विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीच्या कामाला सुरुवात केली. पण काल त्यांनी पुन्हा नाराजीचा सूर आळवला. सांगलीची जागा काँग्रेसकडून जात नव्हती. पण काहीतरी शिजलंय, काहीतरी षडयंत्र झाल्याचा दावा कदम यांनी केला आहे.
सभांना प्रचंड प्रतिसाद
“आम्ही, सर्व विरोधक एकत्र बसलो. त्यावेळी आम्ही हा विचार केला की उगीच जागा जागा मागायच्या नाहीत. जिथे निवडून येण्याची शक्यता आणि भाजपचा पराभव करण्याची शक्यता ज्यांची आहे, त्यांना संधी द्यायची. आम्ही फक्त 10 जागा घेतल्या. कोल्हापूरची जागा स्वतःहून छत्रपती शाहू महाराज यांना आग्रह करुन दिली.जाहीर सभेत प्रचंड प्रतिसाद दिसतोय.” असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी केला खुलासा
राज्यात महाविकास आघाडीने लोकसभा जिंकण्यासाठी काय धोरण ठरवले याची माहिती शरद पवार यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सांगलीच्या जागा वाटपाविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता, सांगली एकच अपवाद आहे. जिथे चर्चा न करता हा मतदारसंघ देण्यात आल्याची माहिती पवारांनी दिली. आता निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो घेऊन मतदारांसमोर जावे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.