महाविकास आघाडीचे जागा वाटप अखेर गुढी पाडव्याचा मुहूर्तावर मंगळवारी झाले. या जागा वाटपात सर्वाधिक चर्चेत आलेली सांगलीची जागा शिवसेनेला मिळाली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा निर्णय जाहीर करताच सांगली काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या. पक्षाचे नेते विश्वजित कदम आणि इच्छूक उमेदवार विशाल पाटील नॉट रिचेबल झाले. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या निर्णयावर सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांनी उद्या बुधवारी तातडीची बैठक बोलवली. विशाल पाटील यांचे कार्यकर्त्यांनी विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची पोस्ट व्हायरल केली.
महाविकास आघाडीने सांगलीची जागा काँग्रेस ऐवजी शिवसेना ठाकरे गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर सांगलीत चांगलीच नाराजी दिसत आहे. विश्वजीत कदम, विशाल पाटील, विक्रम सावंत, जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील प्रमुख नेत्यांनी उद्या तातडीने बैठक बोलवली आहे. या बैठकीत मोठा निर्णय घेतला जाणार आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चर्चेनंतर पुढचा निर्णय घेतला जाईल, असे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. मात्र अंतीम निर्णय विशाल पाटील घेणार आहेत. उद्या बुधवारी सकाळी 11 वाजता बैठक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त करणे सुरु केले आहे. विशाल पाटील प्रेमी कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत. ‘आमचे काय चुकले, आता लढायचं, जनतेच्या कोर्टात’, अशी पोस्ट कार्यकर्ते सोशल मीडियावर टाकत आहेत.
सांगलीची जागा शिवसेनेकडे जाऊ नये, यासाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी बरेच प्रयत्न केले. दोन दिवसांपूर्वी ते दिल्लीत गेले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर नेत्यांसोबत चर्चा केली. ही जागा काँग्रेसची आहे आणि काँग्रेसला मिळावी, अशी भूमिका विश्वजित कदम यांनी मांडली होती. परंतु त्यानंतर ही जागा शिवसेनेकडे गेली. यामुळे आता विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे.