लोकसभा निवडणूक : पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. तर सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटलांनी ठाकरे गटाचं टेंशन वाढवलं. बंडखोरी करत विशाल पाटलांनी आतापर्यंत 4 अर्ज दाखल केले आहेत आणि काँग्रेसचा उमेदवार वेगळ्या चिन्हावर निवडून येणार असा इशारा ठाकरेंना दिला आहे.
सांगली, माढा, सोलापूर आणि कोल्हापुरात शक्तिप्रदर्शन करत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर सांगलीत काँग्रेसच्या तिकिटासाठी आग्रही असलेल्या विशाल पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं टेंशन वाढवलंय. कारण बंडखोरी करत, विशाल पाटलांनी पुन्हा अपक्ष अर्ज दाखल केलाय. आतापर्यंत विशाल पाटलांचे 4 अर्ज दाखल झालेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील मैदानात असताना, महाविकास आघाडीत विशाल पाटलांनी आव्हान उभं केलं आहे.
सांगलीत भाजपच्या संजय काका पाटलांचा सामना महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांशी आहे. तर बंडखोरी किंवा गद्दारी झाल्यास त्या त्या पक्षाची जबाबदारी, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. हातकणंगलेतून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सत्यजित आबा पाटलांनी अर्ज भरला. धाराशीवमध्येही जोरदार शक्तिप्रदर्शन करत ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांनी अर्ज भरला. ओमराजेंसाठी आदित्य ठाकरेंचा रोड शोही झाला. धाराशीवमध्ये महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अर्चना राणा जगजित सिंग पाटलांनी अर्ज दाखल केला.
सोलापुरात माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर, सोलापूरचे उमेदवार राम सातपुतेंनी फडणवीसांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केलं. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील पाटलांनीही सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरला.
सोलापुरात रणजित सिंग निंबाळकर आणि राम सातपुतेंचा अर्ज भरण्यासाठी स्वत: फडणवीस हजर होते. यावेळी फडणवीसांनी, काँग्रेसच्या सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधला. माढ्यात भाजपला झटका देणारे धैर्यशील मोहितेंनीही शरद पवार गटाकडून अर्ज दाखल केला आणि विजयाचा दावा केला. तर रणजित सिंह निंबाळकरांनी धैर्यशील मोहितेंचं आव्हानच नसल्याचं म्हटलं आहे.
धाराशीवमध्ये, ओमराजे निंबाळकरांसाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आणि शिंदे गटावर तुटून पडले. धाराशीवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील अशी थेट लढत आहे.