सांगलीः बाबरी मशीद (Babri Masjid) कारसेवकांनी पाडली तेव्हा मी स्वतः त्यांच्या सोबत होतो, असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadanvis) जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. बाबरी मशीद पडली तेव्हा फडणवीसांचं वय काय होतं? त्यावेळी 13 वर्षाच्या बालकाला घेऊन आडवाणी बाबरी मशीद पाडायला गेले का? तसं असेल तर आडवाणींनी बालकाचे प्राण धोक्यात घातले म्हणून त्यांच्यावरही केस होईल.. हे प्रकरण गंभीर आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. मुंबई येथील सोमय्या ग्राउंडवर महाराष्ट्रदिनी भाजपने घेतलेल्या बूस्टर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिद पाडताना शिवसैनिक तेथे नव्हते असं वक्तव्य केलं. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीदेखील आज फडणवीसांवर अशी उपरोधिक टीका केली आहे.
बाबरी मशीद कारसेवकांनी पाडली. त्यावेळी शिवसैनिक तेथे नव्हते, या फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, ‘ फडणवीस यांची आणि माझी घट्ट मैत्री आहे. त्यांनी बाबरी पाडण्यासाठी गेल्याचे कधीही सांगितले नाही. मी त्यांना भेटल्यावर त्यांनी बाबरीच्या सहभागाची माहिती घेईन. फडणवीस यांनी मला सर्व माहिती सांगावी. मीसुद्धा त्यांना खासगीत विचारणार आहे. बाबरी मशीद पाडल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी जबाबदारी घेतली होती. तशी जबाबदारी फडणवीस घेणार का? त्यावेळी फडणवीसांचं वय काय? त्यावेली १३ वर्षाच्या बालकाला घेऊन आडवाणींनी बाबरी मशीद पाडायला नेलं असलं तर आडवाणींनी बालकाचे प्राण धोक्यात घातले म्हणून केस होईल.
देशात महागाईमुळे मोदी सरकारला अपयश जाणवत आहे. मध्यमवर्गीय, गोरगरीब माणसे महागाईत होरपळत आहेत. मात्र यावर उपाय म्हणून अशी धर्मा-धर्मात तेढ निर्माण केली जात आहे. धर्म ही अफूची गोळी आहे. भाजपा अफूची गोळी महागाई पासून विचलित करण्यासाठी वापरले जात आहे. यासाठी काही बुजगावणी या सगळ्या मुद्दयांचा वापर करत आहेत. कितीही वेळा लक्ष विचलित केले तरी महागाईची चिंता जनतेला आहे. जनतेमधील नाराजी दडवण्याचे काम.. राजकीय भोंगे वाजवण्याचे काम केले जाते आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.