उद्धव ठाकरे उघडपणे आझमींचा निषेध करूच शकत नाहीत कारण…, निरुपम यांचा खोचक टोला

| Updated on: Mar 07, 2025 | 2:37 PM

अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे, तसेच त्यांनी काँग्रेसवर देखील हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे उघडपणे आझमींचा निषेध करूच शकत नाहीत कारण..., निरुपम यांचा खोचक टोला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

शिवसेना नेते संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्यव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले निरुपम? 

सर्वप्रथम, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हे मान्य करावे की अबू असीम आझमी हे महाविकास आघाडीचा भाग आहेत. जेव्हा आझमी यांनी निवडणूक लढवली तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता, आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतः शाल देऊन त्यांचे स्वागत केले. जर आपण एकनाथ शिंदेंबद्दल बोलत असू, तर जर कोणी विरोधी पक्षातून असेल तर त्यांना भेटण्यात काहीच गैर नाही. एका कार्यक्रमात टेबलावर बसलो होतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण त्याला विरोध करणार नाही, उद्धव ठाकरेंची शिवसेना अबू असीम आझमी यांचा उघडपणे निषेध करू शकत नाही. कारण जर त्यांनी निषेध केला तर त्यांच्या मुस्लिम मतांना बाधा येईल, असं निरुपम यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसवर निशाणा    

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबई काँग्रेस कार्यालयाला लवकरच टाळे लागणार आहे. पी. डब्ल्यू. डी. आवारात असलेल्या काँग्रेस कार्यालयाचे 18 लाख भाडे सरकारला दिलेले नाही.  मागील अनेक महिन्याचे वीज बिल न भरल्यामुळे वीज कंपनीने मीटर काढून नेले आहे. काँग्रेस कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहा महिंन्यापासून पगार नाही. शिवसेना ठाकरे गटासोबत युती केल्यामुळे काँग्रेस संपली असं निरुपम यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मुंबईत फक्त तीन आमदार निवडून आलेत तेही मुस्लिम मतांमुळेच निवडून आले आहेत. काँग्रेसचे नेते काल मुंबईत यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी आले होते असं म्हणत त्यांनी यावेळी राहुल गांधी यांना देखील टोला लगावला आहे. अनेक मुस्लिम आता शिवसेना ठाकरे गटाकडे गेले आहेत. मल्लिकार्जुन खरगे प्रचंड जातीवादी असून वेणुगोपाल देखील अकार्यक्षम आहेत, असा आरोपही यावेळी निरुपम यांनी केला आहे.