‘तेव्हाच्या न्यायाधींशाकडे महाराष्ट्राचा खटला नव्हता’, फडणवीसांच्या ट्विटला संजय राऊत यांचं प्रत्युत्तर

| Updated on: Sep 12, 2024 | 8:20 PM

"सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अशा पद्धतीने राजकीय नेत्यासोबत खासगी भेटी करणे सर्वस्वी चुकीचं आहे. गेल्या तीन वर्षांपासून चंद्रचूड यांच्यासमोर महाराष्ट्राच्या घटनाबाह्य सरकारचा खटला सुरु आहे. जेव्हा धनुष्यबाण आणि पक्ष मिंधे मुख्यमंत्र्यांना मिळालं तेव्हा ते म्हणाले होते की मोदी आणि शाह यांचा आभारी आहे. त्यांनी आम्हाला पक्ष आणि चिन्ह मिळवून दिलं. त्यामुळे सरकार टिकलं. याचा अर्थ काय?", असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

तेव्हाच्या न्यायाधींशाकडे महाराष्ट्राचा खटला नव्हता, फडणवीसांच्या ट्विटला संजय राऊत यांचं प्रत्युत्तर
फडणवीसांच्या ट्विटला संजय राऊत यांचं प्रत्युत्तर
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जावून गणपतीची आरती केली. पण विरोधकांकडून त्यावर टीका करण्यात आली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीशांच्या घरी जावून गणपतीची आरती करणं त्यात काहीच गैर नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच याआधीचे पंतप्रधान मनमोहन सिंह हे आपल्या निवासस्थानी इफ्तार पार्टीचे आयोजन करायचे आणि त्या कार्यक्रमात सरन्यायाधीश उपस्थित राहायचे. त्यामुळे सरन्यायाधीशांच्या घरी गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले तर इतका गहजब का? अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या या भूमिकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की, तेव्हाचे न्यायाधीश हे सार्वजनिक कार्यक्रमात गेले होते, ते आरतीच्या नावाखाली खासगी भेटीसाठी गेले नव्हते”, असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं आहे.

“तेव्हाच्या न्यायाधींशाकडे महाराष्ट्राचा खटला नव्हता. देवेंद्र फडणवीस यांचे कामच आहे, शोध करत बसायचं, कोण कुठे गेलं, त्यांना दुसरी कामे नाहीत. फडणवीस यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की तेव्हाचे न्यायाधीश हे सार्वजनिक कार्यक्रमात गेले होते. ते आरतीच्या नावाखाली खासगी भेटीसाठी गेले नव्हते. जर हे त्यांना माहिती नसेल तर त्या कार्यक्रमाचे व्हिडीओ चित्रण मी त्यांना पाठवतो, त्यांना बसून पाहू द्या”, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

‘तीन वर्षांपासून घटनाबाह्य सरकारचा खटला सुरु’

“सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अशा पद्धतीने राजकीय नेत्यासोबत खासगी भेटी करणे सर्वस्वी चुकीचं आहे. गेल्या तीन वर्षांपासून चंद्रचूड यांच्यासमोर महाराष्ट्राच्या घटनाबाह्य सरकारचा खटला सुरु आहे. जेव्हा धनुष्यबाण आणि पक्ष मिंधे मुख्यमंत्र्यांना मिळालं तेव्हा ते म्हणाले होते की मोदी आणि शाह यांचा आभारी आहे. त्यांनी आम्हाला पक्ष आणि चिन्ह मिळवून दिलं. त्यामुळे सरकार टिकलं. याचा अर्थ काय? सर्वोच न्यायालय आणि निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थावर दबाव आणून त्यांना हे सरकारने दिलं. त्या चंद्रचूड यांना पंतप्रधान भेटतात तेव्हा हा देशाच्या लोकशाहीला धोक्याची घंटा वाजवणारा प्रसंग आहे”, असा दावा संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांचा नितेश राणेंवर निशाणा

संजय राऊत यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला. “त्यांच्यावर काही भाष्य करण्याची गरज नाही, त्यांच्या आघाडीत गोंधळ आहे. नितेश राणे बाबतीत हाजी आराफत यांचं वक्तव्य मी ऐकलं, आधी त्या हाजी अराफतला उत्तर द्या म्हणा आणि मग टिवटिव करा म्हणा. हाजी अराफत यांनी त्यांच्या भाषेत जे प्रश्न विचारलेत आधी त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्ययाची हिंमत दाखवा. आम्ही आमची संस्कृती पाळतो, अशा टिल्यापिल्याना उत्तर देत बसलो की मग आम्हाला राजकारण करत बसायला नको. आम्हाला कोणी जनाब सेना कोणी म्हणत नाही, बॅरिस्टर अंतूले हे आमचे मुख्यमंत्री होते, त्यांना आम्ही जनाब म्हणत होतो”, असं संजय राऊत म्हणाले.

‘एक अभ्यासू नेता आपल्यातून हरपला’

दरम्यान, माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तावर संजय राऊत यांनी दु:ख व्यक्त केलं. “एक अभ्यासू नेता आपल्यातून हरपला. अगदी छात्र चळवळपासून त्यांनी काम केलं. आज जेएनयूत जे दिसतंय त्यात मोठं काम त्यांचं होतं. सीताराम येचुरी हे कोणतीही तडजोड न करता काम करणारा नेता होते. त्यांचा इंडिया आघाडी एकत्रित ठेवण्यासाठी कायम पुढाकार होता. पाच दशकांच्या राजकारणाचा अनुभव असलेला हा नेता, ते कमिन्यूस्ट असले तरी सर्वांशी कायम ऋणानुबंध असलेले नेते होते. उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मला वाटलं नव्हतं ते इतकं लवकर आपल्यातून जातील”, अशी भावना संजय राऊतांनी व्यक्त केली.