देशात मोदींची लाट आहे, या भ्रमात राहू नका, असं अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी म्हटलं होतं. मात्र, नंतर त्यांनी आपल्या विधानाची मोडतोड करण्यात आल्याचा दावाही केला होता. नवनीत राणा यांच्या या विधानाची राज्यभरात जोरदार चर्चा रंगलेली असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या विधानाला आणखी हवा दिली आहे. राऊत यांनी थेट नवनीत राणा यांच्या या विधानाशी सहमीत दर्शवली आहे. ते मीडियाशी बोलत होते.
अमरावतीच्या खासदार ताई अगदी बरोबर बोलल्या आहेत, देशात मोदीची लाट नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. पंतप्रधानांनी धार्मिक उत्सवाच्या बाहेर येऊन बोललं पाहिजे. गल्लीतील लोक सुद्धा असे बोलत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
पहिल्या टप्प्यात आमचे उमेदवार नाहीत. महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. कुणी काहीही म्हणू द्या, कितीही सर्व्हे येऊ द्या परिवर्तनांची सुरूवात ही विदर्भातून होते. लोक पक्ष नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार बघत आहेत. रामटेकमध्ये आमचा उमेदवार नाही पण महाविकास आघाडीसाठी मी बैठक घेत आहे, असं संजय राऊत म्हणाले.
निवडणूकीला हळूहळू रंग चढत जाईल, जे सर्व्हे येत आहेत, त्याबाबद्दल आम्ही सहमत नाही. आम्हाला महाराष्ट्र शंभर टक्के यश मिळेल. देवेंद्र फडणवीस जे सांगत आहेत 45 प्लस, त्यांचे आकडे काहीही असू द्या. त्यांना आकडे लावण्याची सवय आहे. निवडणूकीच्या नंतर त्यांना आकडे लावण्याच्या धंद्यात पडावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी यशस्वी होईल. महाराष्ट्रात इंडिया आघाडीला 35 प्लस आणि देशात 305 जागा मिळतील. मुख्यमंत्र्यांना त्यांचा उमेदवार बदलावा लागला, विद्यमान खासदारांला तिकीट देऊ शकले नाही त्यामुळे त्यांना रोड शो घेउ द्या, काहीही हातात पडणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांचं राम प्रेम खोटं आहे. कोणत्याही लढ्यात आणि संघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हते. राम पळपुट्यांच्या मागे राहत नाही. जो आत्मविश्वासाने लढतात त्यांच्या सोबत राम असतो, असा हल्लाही त्यांनी चढवला.