“महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय, त्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. “जे सत्ताधारी आहेत, त्यांच्या सोयीच्या तारखा, पंतप्रधानाच्या सोयीच्या तारखा, गृहमंत्र्यांच्या सोयीच्या तारखा काढण्यात आल्या. मतदारांच्या सोयीच्या तारखा नसतात. त्यामुळे अत्यंत घाईघाईने या निवडणुका घेतल्या जात आहेत. 23 तारखेला मतमोजणी आहे. 25 तारखेपर्यंत विधानसभेची मुदत आहे” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. “इतर राज्यात असं झालं नाही. जम्मू-काश्मीर, हरियाणा बरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका घेता आल्या असत्या. 26 तारखेला नवीन महाविकास आघाडीच सरकार स्थापन होईल. याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही. सरकार आम्हीच स्थापन करणार” असं दावा संजय राऊत यांनी केला.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपा नेत्यांनी त्याग केल्याची आठवण अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना करुन दिली, जागा वाटपात याचा विचार व्हावा असं शाह म्हणाले. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “अमित शाह, भाजपाने कुठलाही त्याग केलेला नाही. अमित शाह यांना महाराष्ट्रावर सूड घ्यायचा होता. अमित शाह यांना शिवसेना तोडायची होती. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला करायचा होता. म्हणून शिंदे आणि त्यांच्या लोकांचा वापर करुन घेतला. भाजपा नेत्यांना त्याग, बलिदान हे शब्द अजिबात शोभत नाहीत. त्या शब्दांचा तो अपमान आहे. त्यांना महाराष्ट्र कमजोर करायचा होता” “शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे प्रादेशिक अस्मितेचे पक्ष त्यांना तोडायचे होते. त्यासाठी त्यांनी आपल्या नेत्यांना जुळवून घ्यायला सांगितलं. त्याला त्याग नाही, स्वार्थ म्हणतात. त्यांनी महाराष्ट्राची लूट केली, त्याला त्याग म्हणणार का?” असं संजय राऊत म्हणाले.
‘हे महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला करणारं सरकार’
“एकनाथ शिंदे यांचा खेळ या निवडणुकीत भाजपाच संपवेल. शिंदे, अजित पवार यांचा खेळ आहे, भाजपा मदारी आहे. सगळी माकडं आहेत, या माकडांना आपल्या तालावर नाचवणार आणि सोडून देणार” असं संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडीच जागावाटप आम्ही लवकरात लवकर जाहीर करु असं ते म्हणाले. “आमच्या उमेदवारांना प्रचारासाठी 30 ते 35 दिवसांचा वेळ पुरेसा आहे. आम्हाला पैसा वाटप करायच नाहीय. आमचा प्रचार झालेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने गद्दारांना धडा शिकवायच ठरवलं आहे. हे महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला करणारं सरकार आहे” अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.
जागा वाटपावर मविआत समाधान नाही का?
मविआत अन्य पक्ष समाधानी नाहीत, त्यावर संजय राऊत म्हणाले की, “आघाडी, युतीमध्ये कुठलाही पक्ष समाधानी नसतो. शिवसेना-भाजपाची 25 वर्ष युती होती. दोन्ही पक्ष जागावाटपानंतर कायम असमाधानी असायचे. युती-आघाडी झाल्यानंतर प्रत्येक पक्षाने भूमिका मान्य करुन समाधान मानायला पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.