मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीतला संवाद त्यांनी आजच्या सामनाच्या रोखठोक सदरात लिहिला आहे. यावेळी संवादादरम्यान राऊतांनी राहुल गांधींना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरे देताना राहुल गांधींनी रोखठोक मतं व्यक्त केली. या चर्चेत दोन्ही नेत्यांमध्ये लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेशमधलं राजकारण, राष्ट्रीय राजकारण, पंजाबमधली राजकीय उलथापालथ अशा अनेक विषयांवर चर्चा झाली.
मंगळवारी दुपारी मी दिल्लीत राहुल गांधीं यांना भेटले. 12, तुघलक लेन हे त्यांचे निवासस्थान. राहुल गांधी लाल रंगाचे टी-शर्ट व पायजमा अशा साध्या वेशात गप्पा मारत होते. ‘या लोकांनी देशात काय चालवले आहे पाहा.’ अशी सुरुवात राहुल गांधी यांनी केली. ‘यह लोक लोकतंत्र को पुरी तरह से खतम करने जा रहे है। लेकीन हम लढेंगे!’ हे त्यांचं पुढचे विधान अधिक महत्त्वाचे. प्रियंका गांधी तुरुंगात होत्या व उत्तर प्रदेश सरकारने राहुल यांच्या या बहिणीस 36 तास बेकायदेशीरपणे डांबून ठेवले. ‘आप चिंता मत करिये,’ असे मी म्हणताच, ‘हम जेल की चिंता नही करेंगे। प्रियंका में हिम्मत है। मी उद्याच लखनौला निघतोय. मला अटक झाली तरी हरकत नाही,’ असे राहुल गांधी म्हणाले.
उत्तर प्रदेशातील सर्वच राजकारणी हातचे राखून लढायला उतरले आहेत. प्रत्येकाचे हात कुठेतरी दगडाखाली अडकले आहेत. त्यामुळे ‘खुलकर’ कोणीच लढत नाही. गांधी यांचा रोख बहुधा मायावतींवर असावा. उत्तर प्रदेशसारखे मोठे राज्य जाती-धर्मात विभागले आहे. त्यामुळेच भाजपचा फायदा होतो, पण एक वेळ अशी येईल काँग्रेसच भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधी हे म्हणाले, तो दिवस लवकर उजाडो हीच अपेक्षा. ‘पंजाबचा तिढा सुटला काय?” मी.
‘नक्कीच. सगळे आमदार काँग्रेससोबतच आहेत. जुन्या व्यवस्थेवरच त्यांची नाराजी होती.” – गांधी.
‘सिद्धूचे काय करणार?” मी.
‘तेसुद्धा शांत होतील.” श्री. गांधी.
आप आणि तृणमूल काँग्रेस मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करून देत आहेत. गोव्यात काही संबंध नसता तृणमूल व आप आली आणि त्यांनी काँग्रेसचे आमदार फोडले. पैशांचा वापर त्यासाठी सगळेच करतात ही खंत गांधींनी बोलून दाखवली. ती खरीच आहे. तृणमूल व आम आदमी पक्ष काँग्रेसला गिळत आहे. त्यांनी भाजपचे निदान शेपूट तरी तोडावे. काँग्रेस कमजोर करणे व त्यातून स्वतः वाढणे हे शेवटी भारतीय जनता पक्षालाच सोयीचे ठरते. ममता बॅनर्जी यांनी बंगाल जिंकले, पण संपूर्ण देशात त्यांना स्वीकारार्हता नाही व केजरीवाल हे केंद्रशासित दिल्लीचेच मांडलिक राजे. हे कोणीच समजून घ्यायला तयार नाही.
हे ही वाचा :
आयकर विभागानं पवार कुटुंबियांना टार्गेट केलंय का? फडणवीसांची पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया