शिवाजी महाराज यांचा मालवणमधील पुतळा पडल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर सरकारच्या विधानाचा चांगलाच पंचनामा केला आहे. वाऱ्याच्या वेगामुळे हा पुतळा पडला असल्याचं सरकारने म्हटलं होतं. त्यावरून संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. पुतळाच बरं पडला? पुतळ्याच्या आजूबाजूची नारळी पोफळीची झाडे पडली नाही. घरांवरची पत्रे उडाली नाही. फक्त पुतळाच कसा पडला? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना सरकारच्या दाव्याची चिरफाडच केली. देशात आणि राज्यात असंख्य पुतळे आहेत. पाण्यात पुतळे आहेत. शिखरावरही आहेत आणि डोंगरावरही आहे. पण या पुतळ्यांना कधी काही झाल्याचं ऐकलं नाही. प्रतापगडावरही पुतळा आहे. तिथे तर 120 ते 600 किलोमीटर वेगाने वारे वाहतात. त्या पुतळ्याला काही झालं नाही. शाहू महाराज आणि पंडित नेहरू यांनी पुतळे उभे केले आहेत. पण त्या पुतळ्यांनाही काही झालं नाही. पण सात महिन्यांपूर्वी निर्माण केलेला पुतळा पडलाच कसा? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
थेट कनेक्शन…
मालवणच्या या किल्ल्याच्या आणि पुतळ्याच्या बाजूला नारळी पोफळीची असंख्य झाडे आहेत. यातील एकही झाड पडलं नाही. या परिसरातील घरावरची पत्रे उडाली नाही. वादळ आलं तर झाडं पडतात, घरावरची पत्रे उडून जातात. या ठिकाणी मात्र असं काही झालं नाही. वादळाने फक्त पुतळाच पडला. पुतळाच कसा पडला? कारण पुतळा पोकळ होता. त्याचं थेट कनेक्शन ठाण्याशी आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं त्यात कनेक्शन आहे. या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
सरकारचाच संबंध
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंनी हा पुतळा नेव्हीने उभारला असल्याचं म्हटलं होतं. या पुतळ्याशी सरकारचा काही संबंध नसल्याचा दावाही केला होता. फडणवीस यांचा हा दावा संजय राऊत यांनी फेटाळून लावला आहे. या पुतळ्याचा संबंध राज्य सरकारशीच आहे. नेव्हीशी नाही. पीडब्ल्यूडी विभागानेच हा पुतळा उभारला आहे. मला तोंड उघडायला लावू नका, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे सरकारची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या पुतळा प्रकरणावरून आज सिंधुदुर्गात मोठं आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीने भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. आदित्य ठाकरे आणि जयंत पाटील या मोर्चात सहभागी होणार आहे. हा अत्यंत मोठा मोर्चा असेल असं सांगितलं जात आहे. तर, स्वत: संजय राऊत 30 तारखेला सिंधुदुर्गात जाऊन पुतळ्याची पाहणी करणार आहे. आम्ही निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत. आम्ही षंढ होऊन बसायचं का? आम्ही या घटनेचा निषेध नोंदवणार आहोत, असंही राऊत यांनी म्हटलंय.