शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र वायकर यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यावर प्रचंड दबाव होता. जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हेच पर्याय माझ्याकडे होते. त्यामुळे मी पक्ष बदलला, असा खळबळजनक गौप्यस्फोट रवींद्र वायकर यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वायकर यांच्या या विधानाने महायुतीच्या अडचणी वाढलेल्या असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र वायकर यांच्या या विधानाचं समर्थन केलं आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना रवींद्र वायकर यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. वायकर जे बोलले ते खरं बोलले. एकनाथ शिंदे यांच्या समोर देखील तीच भूमिका होती. जेल की गद्दारी ? त्यांनी जेलच्या ऐवजी गद्दारी किंवा पक्षांतर आणि त्यांच्या बरोबरच्या सगळ्या लोकांनी तोच मार्ग स्वीकारला. जेलमध्ये जाण्याची हिंमत यांनी कधी दाखवली नाही. आम्ही दाखवली. आम्ही पक्षांतर केलं नाही. आम्ही जेलमध्ये गेलो, असं संजय राऊत म्हणाले.
उगाच छात्या फुगवू नका
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक स्वातंत्र्यवीरांनी शरणागती पत्कारली नाही, ते तुरुंगात गेले आणि हुतात्मे झाले. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्यापैकी एक. त्यामुळे या सगळ्या लोकांची कोणत्याही स्वातंत्र्याच्या लढ्यातील क्रांतीकारकांचे नाव घ्यायची औकात नाही. तुम्ही शरणागत झालेला आहात. आपण गुलामी पत्करलेली आहे. त्या पद्धतीनेच बोललं पाहिजे. त्या पद्धतीने जगलं पाहिजे. उगाच छात्या फुगवून बोलू नका, असा हल्लाच राऊत यांनी चढवला.
तुम्ही औरंगजेबाचे वंशज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावरही त्यांनी टीका केली आहे. मोदींनी बाळासाहेब आणि माँ साहेबांबद्दल अत्यंत चुकीचं विधान केलं आहे. हे दोन्ही अत्यंत देवता समान अशी व्यक्तिमत्व होती. या दोन्ही व्यक्तिमत्त्वांना महाराष्ट्र पुजतो. त्यांना तुम्ही नकली म्हणता ही तुमची हिंमत आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाची संतान आहात. तुम्ही औरंगजेबाची वंशज आहात. तेलंगणात जाऊन महाराष्ट्राबद्दल अशा प्रकारची भाषा करणे हे बरोबर नाही, अशी टीका राऊत यांनी केली.
ती एक विकृती
औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला तर मी काय चुकीचा बोललो? ज्या मातीत औरंगजेबाचा जन्म झाला, त्या मातीचे काही गुणधर्म राज्यकर्त्यांना लागले असतील. मोदी आणि शाह त्याचप्रमाणे महाराष्ट्रावरती हल्ले करत आहेत. महाराष्ट्र तोडण्याचा, महाराष्ट्र लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यात कोणाला मिरची लागण्याची काय गरज? मी कोणाला औरंगजेब म्हटलं नाही, ही एक विकृती आहे, असंही ते म्हणाले.