आम्हाला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना अशी स्वप्न पडतात. त्यांना सत्तेचा आजार झाला होता. फडणवीस यांना गांभीर्याने घेऊ नका. फडणवीस हे राजकारणातील कच्च मडकं आहेत. अत्यंत कच्च मडकं आहे. कॉपी करून पास होणाऱ्या लोकांसारखे ते आहेत. तसं हे मडकं आहे, असा जोरदार हल्ला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चढवला आहे. आम्ही नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती आणि आम्ही हरलो. हे फडणवीस यांना माहीत नसेल. ते तेव्हा राजकारणात फार नव्हते, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे स्वत:चं असं काही नाही. लोकं त्यांना मतं देणार नाहीत. महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकत आहे. अजित पवार गट एकही जागा जिंकणार नाही. शिंदे गटालाही एकही जागा मिळणार नाही. आमचे कार्यकर्ते तनमनधनाने काम करत आहेत. अजित पवार यांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्या आहेत. ते मोकळे झाले आहेत. मुख्यमंत्र्यांची धावपळ सुरू आहे. त्यांची अखेरची तडफड सुरू आहे. त्यांचं बॅलन्स शिल्लक नाही. डिपॉझिट जाईल, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी राहणार नसल्याचं संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. मोदींना सप्टेंबरमध्ये 75 वर्ष होत आहेत. 75 वर्षावरील नेत्यांनी संसदीय राजकारणात राहायचं नाही, असा नियम मोदींनीच केला आहे. त्यांनीच नियम केल्याने त्यांना दूर जावं लागणार आहे. पण त्या आधीच 4 जून रोजी मोदींना सत्तेतून पायउतार व्हावे लागेल, असं संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना मुलाखत दिली होती. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. हा काळूबाळूचा तमाशा आहे, असं बावनकुळे म्हणाले. त्यावरही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही तमाशाचा अपमान करत आहात. काळूबाळूचा तमाशा ही सांस्कृतिक ताकद होती. काळूबाळू यांनी लोकांना जागृत केलं होतं. त्यांनी समाजाचं प्रबोधन केलं. त्यांनी मोठी सामाजिक सुधारणा केली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांना महाराष्ट्राच्या सांस्कृतीशी काही घेणंदेणं नाही. त्यांनी महाराष्ट्राचा अभ्यास करावा. डफावर जी थाप पडते तीच थाप यांच्या कानाखाली पडल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाच त्याांनी चढवला.