मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्या मुलाने केटरिंग व्यावसायिकाला धमकी दिल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय. संजय शिरसाठ यांचा मुलगा सिद्धांत शिरसाठ यांनी केटरिंग व्यावसायिक त्रिशरण गायकवाड यांना हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. वाढदिवसाच्या पार्टीचं बिल मागितल्याने धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे संजय शिरसाठ यांची एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाल्याचा दावा करण्यात येतोय. वाढदिवसाच्या पार्टीचं बिल मागितल्याने धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय. संबंधित ऑडिओ क्लिपची पुष्टी ‘टीव्ही 9 मराठी’ करत नाही.
ऑडिओ क्लिकमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
त्रिशरण गायकवाड (केटरिंग व्यावसायिक) : 40 हजार रुपये साहेबांसोबत बोलणं झालं. पण मला वीच हजार रुपये दिले.
सिद्धांत शिरसाठ : साहेबांनी जेवढे सांगितले तेवढे दिले. आता एकही रुपही नाही मिळणार
त्रिशरण गायकवाड : काय झालं भाऊ?
सिद्धांत शिरसाठ : साहेबांनी जेवढं सांगितलं तेवढं दिले. विषय संपला आता.
त्रिशरण गायकवाड : भाऊ अजून वीस हजार बाकी आहेत ना भाऊ
सिद्धांत शिरसाठ : जास्त खबाब करायचं नाही बरं का
त्रिशरण गायकवाड : भाऊ तुमच्याकडे कामाचे पैसे बाकी आहेत ना? तुमचा शब्द ऐकून 75 हजार रुपये वापस केले. असं नका करु ना
सिद्धांत शिरसाठ : उपकार केले ना तू?
त्रिशरण गायकवाड : भाऊ तसे शब्द नका ना वापरु. कामाचे पैसे आहेत ते देऊन टाका
सिद्धांत शिरसाठ : तुझे कसले कामाचे पैसे रे?
त्रिशरण गायकवाड : त्याच कामाचे पैसे जे बाकी राहिले होते 40 हजार
सिद्धांत शिरसाठ : हे आता डोक्याच्या वर झालं
त्रिशरण गायकवाड : साहेबांनी ४० हजार बोलले होते पण मला २० हजार दिले
सिद्धांत शिरसाठ : मग तेव्हा का नाही बोललो?
त्रिशरण गायकवाड : मला आता परत यावं लागेल ऑफिसला
सिद्धांत शिरसाठ : परत आला तर तुझे हातपाय तोडतो
त्रिशरण गायकवाड : भाऊ असं नका बोलू ना
सिद्धांत शिरसाठ : असं नका बोलू म्हणजे? कुठेस तू आता?
त्रिशरण गायकवाड : घरीय ना
सिद्धांत शिरसाठ : थांब येतो तिथे