रायगडच्या पालकमंत्रिपदावरून पुन्हा राष्ट्रवादी, शिवसेनेत जुंपली; ‘पंचांचा निर्णय चुकला तर…’, शिरसाट यांचं तटकरेंना रोखठोक उत्तर

| Updated on: Feb 17, 2025 | 6:27 PM

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. संजय शिरसाट यांनी तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून पुन्हा राष्ट्रवादी, शिवसेनेत जुंपली; पंचांचा निर्णय चुकला तर..., शिरसाट यांचं तटकरेंना रोखठोक उत्तर
Follow us on

रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रिपद सध्या महायुतीसाठी कळीचा मुद्दा ठरला आहे. नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं. तर रायगडचं पालकमंत्रिपद हे आदिती तटकरे यांना देण्यात आलं. मात्र या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे नेते इच्छूक होते. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी दाद भुसे हे इच्छूक होते. यावरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आता पुन्हा एकदा पालकमंत्रिपदावरून सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांना टोला लगावला आहे, तर संजय शिरसाट यांनी सुनील तटकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे?  

रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी केली. निमित्त होतं मंत्री आदिती तटकरे आयोजित नामदार आदिती चषक क्रिकेट स्पर्धेचं. या फटकेबाजीला किनार होती रायगडच्या पालकमंत्रिपदाची.  पंचांनी दिलेला निर्णय अनेकांना मान्य नसतो, मग आरडा ओरडा सुरू होते. स्लो मोशनमध्ये कळतं की आरडाओरडा करणाऱ्यांपेक्षा निर्णय देणारा पंच योग्य असतो, अशी कोपरखळी त्यांनी यावेळी पालकमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या भरत गोगावले यांना मारली.

भारतीय संघाचा कर्णधार धोनी हा कॅप्टन कुल म्हणून ओळखला जात होता. कॅप्टन कुल असेल तर सामन्यात यश मिळतं जर तो भडक डोक्याचा असेल तर सगळे खेळाडू पण भडक डोक्याचे होतात आणि मग मॅचची वाट लागते, असा टोलाही त्यांनी मंत्री गोगावले यांना नाव न घेता लगावला. अपील एका विशिष्ट मर्यादे पर्यंत करा, असा सल्लाही यावेळी तटकरे यांनी गोगावले यांना दिला.

दरम्यान सुनील तटकरे यांच्या या टिकेला आता मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  जर पंचांचा निर्णय चुकला तर काय होऊ शकतं हे आपण सर्वांनी अहिल्यानगरमध्ये पाहिलंच आहे, असा टोला त्यांनी यावेळी तटकरे यांना लगावला आहे.  आता यावर तटकरे काय प्रत्युत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.