Santosh Deshmukh murder case: राज्यातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. या हत्या प्रकरणात मुख्य संशयित वाल्मिक कराड तब्बल २२ दिवसांनी पोलिसांना शरण आला. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधाबाबत विरोधकांकडून टीका केली जात आहे. भाजप नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी परभणीत मोठी घोषणा केली आहे. नरेंद्र पाटील यांनी बीडमधील गुन्हेगारी संपवण्यासाठी आता यापुढे प्रत्येक आठवड्यात दोन ते तीन दिवस बीडला मुक्काम करण्याची घोषणा केली.
परभणीतील मोर्चात बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, आमचा समाज एकच मागणी करतोय आकाला उचला आणि आकाचा नेता त्यालाही उचला. या आकाचा नेता धनंजय मुंडे आहे. त्यांचा राजीनामा घ्यावा. आमचे ते काय सोयरे नाहीत. अरे आम्ही जातिवंत मराठा आहो. आमचे रक्त 96 कुळी आणि जातिवंत असणार आहे. नेता कोणीही असो पण समाज महत्वाचा आहे.
परभणीत सर्वपक्षीय, सर्व समाज आणि संघटनांची एकत्र बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत परभणीत 4 जानेवारी रोजी सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बीडमधील गुन्हेगारीवर टीका करताना नरेंद्र पाटील म्हणाले, बीडमध्ये गुंडाराज आहे. त्या नेत्याला आम्हाला घरी बसवायचा आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक वाल्या तयार झाला आहे.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना विनंती की प्रत्येक जिल्ह्यातील वाल्याला ठेचून मारला पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती करतो की, संदीप भाई यांनी सांगितले ते बरोबर आहे. पुणे हे राजकारणचे केंद्र आहे. पुण्याचा नेता कोण आहेत. ( जनतेतून आवाज आला…अजितदादा). दादा मी तुमच्या पक्षात काम केले. तुमच्यामुळे आमदार झालो. पण आता एक आवाहन आहे. अजितदादांनी आपल्या नेत्याला मंत्रिपदावरून काढून टाकले पाहिजे.
नरेंद्र पाटील अजित पवार यांना संबोधित करताना म्हणाले म्हणाले, दादा धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायची वाट पाहू नका. त्यांना हात धरून मंत्रिमंडळातून बाहेर काढा आणि गावाला पाठवा. बीडमधील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आता सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.