बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे पुढील दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांनी सातारा-जावळी मतदारसंघ निवडला आहे. अभिजीत बिचुकले यांची उमेदवारी लढवण्याची ही चौथी टर्म आहे. यावेळी ते सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात उमेदवारी लढवणार असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. अभिजीत बिचुकले यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपण निवडणूक का लढवत आहोत? याबाबतची माहिती दिली. “अभिजीत बिचुकले निवडून आले तर नवीन उमेद येईल. नवीन आशा येईल. नवीन धोरणे येतील आणि महाराष्ट्रात साताऱ्याचा डंका वाजेल”, असा दावा बिचुकले यांनी केला आहे.
“2019 च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मध्ये माझी आदित्य ठाकरे यांच्यासोबत लढत झाली होती. आता सातारा जावळी मतदारसंघांमध्ये मतदारांना सुवर्णसंधी देत आहे. 2004 पासून सलग चार टर्म मी ही निवडणूक लढत आहे. विकासाच्या दृष्टीने विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि बिचुकले अशी लढत पाहायला मिळेल. सर्व सातारकरांनी मागील वेळी ज्याप्रमाणे उदयनराजेंचा पराभव केला होता त्याप्रमाणे आता मला विधानसभेत निवडून द्या”, असं आवाहन अभिजीत बिचुकले यांनी केलं.
“मी जर 288 आमदारांमध्ये जाऊन बसलो तर मी सर्वांचे सोनं करणार. मी कुणाच्या पाठीमागे फिरत नाही. माझी स्वतःची ओळख आहे. मी कोणत्या पक्षाच्या पाठीमागे फिरत नाही. तुम्ही तुमची मतं विकू नका. आणि मला निवडून द्या. जेणेकरून मी साताऱ्याची अस्मिता राखेन”, असा दावा अभिजीत बिचुकले यांनी केला.
“साताऱ्याचा विकास झाला आहे का? हे तुम्हीच सांगा. दोन्ही राजांच्या मनात आलं की ते विभक्त होतात आणि नंतर मनोमिलनही करतात. एमआयडीसीचा प्रश्न आहे.मी ब्रँड बिचुकले झालो आहे. कोणाचा मी मिंदा नाही. मी निवडून आलो तर महाराष्ट्रात साताऱ्याचा डंका वाजेल”, असं अभिजीत बिचुकले म्हणाले.