‘शरद पवार माझ्या बारशाला आले होते, पण मी आता बच्चा राहिलेलो नाही’, कॉलर उडवत उदयनराजे काय म्हणाले?

| Updated on: Apr 04, 2024 | 7:08 PM

"त्यांचं सगळ्यांच माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते माझ्याबद्दल विचार करत असतील की, जाऊदे बच्चा समजके छोड देंगे. असं ते जरी म्हणत असले तरी आता दुसरी बाजू अशी आहे, लहान होतो ते ठीक आहे, पण आता बच्चा राहिलेलो नाही", असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसेल यांनी केलं.

शरद पवार माझ्या बारशाला आले होते, पण मी आता बच्चा राहिलेलो नाही, कॉलर उडवत उदयनराजे काय म्हणाले?
udayanraje bhosale
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुन्हा कॉलर उडवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे यांच्यासारखी कॉलर उडवत त्यांना चॅलेंज दिल्याची चर्चा होती. त्यानंतर आज उदयनराजे यांनी पुन्हा कॉलर उडवली. विशेष म्हणजे त्यांनी शरद पवारांवर टीका करणं टाळलं. “शरद पवार वडीलधारी आहेत. ते माझ्या बारशाला आले होते. मी त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत. मैत्रीपूर्व लढत होईल”, असं उदयनराजे भोसले म्हणाले. “सर्वांच्या गाठीभेटी घेतल्या. मी आधीच सांगितलंय, सातारा लोकसभा मतदारसंघातून उभं राहणार म्हणजे राहणार. काय लाजायचं आणि काय लपवून ठेवायचं? उभं राहणार. जे काही असेल ते बघू”, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

“नेमकं काही नाही. मी आजपर्यंत कधी राजकारण केलेलं नाही. केलं तर संपूर्ण समाजकारण केलं. लोकहिताचं केलं. कधी कुणाच्या मध्ये बोललो नाही. कधी कुणाला दुखवलं नाही. लोकांचं प्रेम आहे. शेवटी लोकशाहीत लोकांचं प्रेम आहे. ते ठरवतील काय करायचं ते. मी इतक्यात जात नाही. जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत लोकांची सेवा करणार आहे. मग बघू सर्व”, असं उदयनराजे म्हणाले.

‘शरद पवार वडीलधारी’

“शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार? ते वडीलधारी आहेत. माझ्या बारशात जेवलेल्या लोकांबद्दल मी काय बोलू? काय बोलणार? मी सहज कासला गेलो होतो. घाटातल्या मंदिराची यात्रा होती. तिथे लोकं रजनिकांतच्या स्टाईलबद्दल बोलत होते. तिथे माझा जीवलग मित्र होता. तो म्हणाला, तुमची काय स्टाईल? मी म्हटलं, आपली काय स्टाईल? मी कुणाचं वाईट केलं नाही. लोकांच्या हिताचं काम केलं”, असं म्हणत उदयनराजे यांनी कॉलर उडवली. “माझ्यावर कॉलर उडवण्यावरुन टीका केली. कॉलर काढून घ्या किंवा काहीही काढून घ्या. पण लोकांचा जीव तुम्ही काढून घेऊ शकत नाही”, असं उदयनराजे म्हणाले.

“माझे सर्वांशी मैत्रीचे संबंध आहेत. वैचारिक मतभेद अशू शकतात. पण याचा अर्थ वेगळा नाही. कदाचित माझं चुकीचं असेल त्यांचं बरोबर असेल. पण ज्यांचे विचार त्यांच्याजवळ, माझे विचार माझ्याजवळ. चर्चेतून मार्ग काढू शकतो. मगल कुणाला कमी लेखण्याचा विषयच येत नाही. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी मोठा आहे. श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे हे सर्व मित्रमंडळी. श्रीनिवास पाटील हे माझ्या वडिलांचे खास मित्र होते. त्यांनी मला सांगितलं की, मी बारशात आलो होतो. तेव्हा मी पाळण्यात होतो. मी म्हटलं मला आठवत नाही. ठीक आहे. त्यांचा आशीर्वीद अपेक्षित आहे. ज्यांना उभं राहायचं आहे, राहा उभं”, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी मांडली.

‘आता बच्चा राहिलेलो नाही’

“त्यांचं सगळ्यांच माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते माझ्याबद्दल विचार करत असतील की, जाऊदे बच्चा समजके छोड देंगे. असं ते जरी म्हणत असले तरी आता दुसरी बाजू अशी आहे, लहान होतो ते ठीक आहे, पण आता बच्चा राहिलेलो नाही. मला माझं कार्य केलं पाहिजे. त्यांनी त्यांचं कार्य केलं पाहिजे”, असं उदयनराजे म्हणाले.

‘पावसामुळे सगळं झालं’, 2019च्या पोटनिवडणुकीवरुन उदयनराजेंचा टोला

“पावसामुळे सगळं झालं. यावेळीस तसं नाही. पण मला वाटतं पाऊस पडावा. राजकारण, निवडणुका सोडून द्या. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा पाण्याचा आहे. आज धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी झालाय. पाऊस पडला पाहिजे. काही लोकं म्हणत असतील, निवडणुकीच्या काळात पाऊस पडतो. पडला तर योग्यच आहे”, असं मत उदयनराजे यांनी मांडलं. “लोकसंख्या वाढली की प्रश्न वाढत जातात. विकास थांबत नाही. विकास चालू राहतो”, असंही ते म्हणाले.