मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

| Updated on: Oct 18, 2024 | 9:09 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची आज इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावाहून पुणे विमानतळाच्या दिशेला रवाना झाले होते. यावेळी खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर हवेत भरकटलं होतं. सुदैवाने त्यांच्या हेलिकॉप्टरची सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग
Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावाहून पुण्याच्या दिशेला रवाना झाले होते. या दरम्यान अचानक हवामान खराब झालं आणि पावसाला सुरुवात झाली. यामुळे हेलिकॉप्टरला पुढे जाण्यास अडचणी येऊ लागल्या. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पुढे जाण्याऐवजी मागे येऊ लागले. वाऱ्याचा आणि पावसाचा वेग इतका जास्त होता की, हेलिकॉप्टर जमिनीपासून केवळ 15 फूट अंतरापर्यंत पोहोचलं होतं. विशेष म्हणजे खाली कोयना धरणाचं बॅकवॉटर होतं. तसेच आजूबाजूला हेलिकॉप्टर लँड करण्यासारखी जमीन नव्हती. पण पायलटने प्रसंगावधान साधल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या संकटातून बचावले. मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असलेले त्यांचे इतर सहकारी सुखरुप आहेत. शिंदे यांचं हेलिकॉप्टर पुन्हा दरे गावात लँड करण्यात आलं आणि ते रस्ते मार्गाने पुण्याच्या दिशेला रवाना झाले. एकनाथ शिंदे जागावाटपाच्या बैठकीसाठी दिल्लीत रवाना होणार आहेत. त्यामुळे ते पुणे विमानतळाहून दिल्लीच्या दिशेला रवाना होणार आहेत.

“मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंग करण्यामागचा थरार सांगितला आहे. महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे मूळ गाव असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावातून हेलिकॉप्टरने पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, मंगेश चिवटे आणि विशेष कार्य अधिकारी कवळे हे देखील हेलिकॉप्टरमध्ये होते. यावेळी पुण्याच्या दिशेला जात असताना अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले अन् मुसळधार पाऊस सुरु झाला. यामुळे हेलिकॉप्टर हवेत भरकटायला लागलं. कोयना बॅकवॉटरच्या अगदी पंधरा फूटवर हेलिकॉप्टर खाली आले होते”, अशी माहिती मंगेश चिवटे यांनी दिली.

‘प्रसंगादरम्यान केलेल्या पुण्यकर्माची आठवण झाली’

“आजूबाजूच्या कोणत्याही एका शेतामध्ये हेलिकॉप्टर लँड करावे का? याबाबत पायलट आमच्याजवळ विचारणा करत होते. पण त्या सोयीची कोणतीही जमीन आजूबाजूला नसल्याने आमचे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा माघारी दरे या गावाच्या दिशेने निघाले. जेथून आम्ही टेकऑफ घेतला होता त्याच ठिकाणी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड झाले आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले”, असं मंगेश चिवटे यांनी सांगितलं.

“अशावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्याची संभावना अधिक प्रमाणात असताना महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्वजण सुखरुप आहोत. या संपूर्ण प्रसंगादरम्यान वाचताना केलेल्या पुण्यकर्माची आठवण झाली. आता आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो आहोत”, अशी प्रतिक्रिया मंगेश चिवटे यांनी दिली.