सातारा | 21 ऑक्टोबर 2023 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची उद्या मोठी सभा पार पडणार आहे. मनोज जरांगे पाटील आता मराठा आरक्षणासाठी पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. काहीही झालं तरी आता मागे हटायचं नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामुळे राज्य सरकारपुढील आव्हान वाढण्याची शक्यता आहे. असं असताना राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मराठा समाजासाठी आरक्षण कधी लागू होईल? याबाबत त्यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.
“मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. मराठा आरक्षणा संदर्भातील आमची मंत्रिमंडळाची उपसमिती आहे. त्यातून राज्यभरातील मराठा समाजातील समन्वयकांशी चर्चा झाली आहे. यामध्ये कायमस्वरूपाचे आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार बांधील आहे आणि त्यानुसार आमचे प्रयत्न सुरू आहेत”, असं शंभुराज देसाई यांनी सांगितलं.
“सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकवायचं असेल तर क्युरीटी पिटीशन हा पर्याय आहे. याचा ड्राफ्ट तयार आहे. अत्यंत भक्कम क्युरीटी पिटीशन आपण दाखल केले आहे. मराठा आरक्षण मिळू नये या मताचं राज्य सरकार नाही. जस्टिस शिंदे समितीचा अहवाल येणे गरजेचे आहे. तो अहवाल आल्यावर याच्यामध्ये सकारात्मक निर्णय आम्ही घेणार आहोत”, असं शंभुराज देसाई म्हणाले.
“या आरक्षणाबाबत सरकार कोणतीही दिरंगाई करत नाही. दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. महाराष्ट्रातील जनतेला मी आवाहन करतो, राज्य सरकारची भूमिका समजावून घ्यावी. सरकार कुठेही कमी पडत नाहीय. ज्या न्यायालयीन आणि प्रशासकीय बाबी पूर्ण करायच्या आहेत त्या सरकार पूर्ण करत आहे. यामुळे या सरकारला सहकार्य करावे”, असं मत मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केलं.