वेगानं अक्षता फेकल्याचा वाद, मग नवरी मुलीच्या मामाचे कान ‘चेक’ केल्याचा राग, लग्न मोडलं! स्थळ : सातारा

| Updated on: May 29, 2022 | 11:26 AM

चौथ्या मंगलाष्टकेनंतर एकमेकांना थांबवून जाब विचारण्यास सुरुवात झाली. शाब्दिक वाद वाढत गेला.

वेगानं अक्षता फेकल्याचा वाद, मग नवरी मुलीच्या मामाचे कान चेक केल्याचा राग, लग्न मोडलं! स्थळ : सातारा
लग्न मोडण्याचं असंही एक कारण..
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

सातारा : लग्नात (Marriage) अक्षता म्हणजे एक प्रकारचे आशीर्वादच. पण एका जोडप्यासाठी ह्या अक्षता त्यांच्या लग्न मोडण्याचं कारण ठरल्या. घटना साताऱ्यातली. साताऱ्यातील (Satara) एका लग्नात मंगलाष्टका सुरु होत्या. अक्षताही डोक्यावर पडत होत्या. पण मध्येच काय झालं कुणास ठाऊक! लग्नाचा मंडप आखाड्यात बदलला गेला. जोरादार हाणामारी सुरु झाली. वऱ्हाडी फ्रीस्टाईलमध्ये भिडले. काही वेळानंतर वादाचं कारणही कळलं. वेगानं अक्षता टाकल्या जात असल्यानं वाद झाला. करवलीच्या अंगावर वेगात येणारे अक्षतांचे तांदूळ वादाचं कारण ठरलं आणि दोन गट भिडले. इतकंच काय, तर वयस्कर असलेल्या नवरी मुलीच्या मामाच्या कानशिलात लगावल्यानं वाद आणखीनच वाढला. हे सगळं प्रकरण पोलीस (Satara Police) स्थानकापर्यंत गेलं आणि अखेर लग्न मोडलंच.

नेमकं कुठं घडलंय?

साताऱ्यात बोरगाव इथं एक मंगल कार्यालय आहे. एका लग्नाचं तिथं आयोजन करण्यात आलं होतं. पाहुणे-यजमानी लग्नाच्या गडबडीत, उत्साहात होते. मुहूर्त जवळ आला होता. आंतरपाट धरला गेला. नवरामुलगा सज्ज होता. नवरी मुलगी सज्ज होती. लग्नाचे हार आणले गेले होते. एकमेकांच्या गळ्यात माळ टाकण्याआधीच्या मंगलाष्टका सुरु झाल्या होत्या. पहिली मंगलाष्टक झाली, दुसरीही झाली. पण तिसऱ्या मंगलाष्टकेनंतर काहीतरी बिनसलं.

साssssवधान…!

शुभमंगल साssssवधान, असं मंगलाष्टकेच्या शेवटी म्हणताच अक्षता पडत होत्या. पण वराकडील काही उत्साही मंडळींकडून करवलींवर वेगाने तांदूळ फेकले जात असल्याचा आरोप करण्यात आला. तिसऱ्या मंगलाष्टकेवेळी प्रकरण जास्त वाढलं. चौथ्या मंगलाष्टकेनंतर एकमेकांना थांबवून जाब विचारण्यास सुरुवात झाली. शाब्दिक वाद वाढत गेला. यात एकानं हद्द केली. वयस्कर असलेल्या मुलीच्या मामाच्या कानशिलातच लगावल्यानं वाद टोकाला गेला.

हे सुद्धा वाचा

स्वप्न चक्काचूर

प्रकरण वाढलं. सगळे हमरीतुमरीवर आले. वाद गुद्द्यांवर आला. वऱ्हाडींनी घातलेल्या गोंधळामुळे रेशीमगाठी जुळण्यापूर्वीच तुटल्या. सरतेशेवटी सगळं वऱ्हाड पोलीस ठाण्यात आलं. पोलिसांनी लग्न जुळवण्यासाठी आपल्या परीनं प्रयत्नही केले. पण मुलीच्या मामाचे कान चेक करण्यात आल्यानं संतापलेले यजमानी लग्न जुळवून घेण्यास मान्यच नव्हते. दोघाची सुशिक्षित असलेल्या मुला-मुलींनी एकमेकांच्या पसंतीनं आयुष्याची स्वप्न रंगवली होती. पण काही टवाळखोरांमुळे त्या दोघांच्या स्वपांचा चक्काचूर झालाय.