सुषमा अंधारे यांना शरद पवार यांच्यासमोर अश्रू अनावर, अजितदादा यांच्याविषयी नेमकी तक्रार काय?

| Updated on: May 09, 2023 | 6:54 PM

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज भर मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर भाषण करताना भावूक झाल्या. त्यांनी भाषण करताना अजित पवार यांची तक्रार केली. यावेळी त्यांनी आपली चूक असेल तर माफ करा, असंही आवाहन शरद पवार यांना केलं.

सुषमा अंधारे यांना शरद पवार यांच्यासमोर अश्रू अनावर, अजितदादा यांच्याविषयी नेमकी तक्रार काय?
Follow us on

सातारा : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर अक्षरश: रडल्या. सुषमा अंधारे यांनी भर मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची शरद पवार यांच्याकडे तक्रार केली. संबंधित तक्रार करत असताना सुषमा अंधारे यांना रडू कोसळलं. काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या, असं सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या. शरद पवार यांच्याबाबतचा जुना किस्सा सांगतानादेखील सुषमा अंधारे भावूक झाल्या. माझ्याविरोधात अश्लाघ्य बोललं गेलं त्यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात बोलायला हवं होतं, असं म्हणत सुषमा अंधारे भावूक झाल्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात सुषमा अंधारे बोलत होत्या.

“सर इथे राजकारणाचा विषय नाही. पण आवर्जून सांगणं गरजेचं आहे. अश्लाघ्य पद्धतीने जेव्हा आमदार माझ्यावर टीका करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही, मला अपेक्षित होतं सर, सभागृहात आपण सगळे विरोधी पक्ष म्हणून बाकावर बसतो. तक्रार का लिहून घेतली नाही? खरे की खोटं? पब्लिक डोमेनमध्ये सगळा कंटेंट आहे. तरीसुद्धा सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न विचारायला हवा होता”, असं म्हणत सुषमा अंधारे यांना रडू कोसळलं.

“माझं चुकत असेल तर कान पकडा. मी लाखवेळा माफी मागायला तयार आहे. कारण मी आपल्याकडे हक्काने बोललंच पाहिजे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी शरद पवार यांचा जुना किस्सा सांगताना देखील सुषमा अंधारे यांना रडू कोसळलं. सुषमा अंधारे यांच्या कुटुंबावर संकट कोसळलं तेव्हा शरद पवार यांनी आपल्याला मदत केल्याची माहिती त्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

सुषमा अंधारेंनी पवरांचा नेमका जुना किस्सा काय सांगितला?

“सर, लोकं आपल्याकडे आधारवड वगैरे म्हणतात. आपण राजीनामा दिला तेव्हा त्यादिवशी आपल्यासाठी पत्र लिहिलं होतं ते वाचून दाखवणार आहे. त्यादिवशी राऊत साहेबांनी प्रिंट काढून दिली, असं मला माहिती मिळाली. पण हे पत्र मला पुन्हा एकदा आपल्यासमोर सांगितलं पाहिजे. मला आपला राजीनामा नको होता म्हणून मी पत्र लिहिलं होतं”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

“सर नमस्ते, खरंतर मी आपल्याला पत्र लिहावं किंवा सांगावं एवढी माझी प्रज्ञा निश्चित नाही. पण आपला निर्णय एकूणच फक्त पक्ष म्हणून नाही तर महाराष्ट्रातीव बहुजन, उपेक्षित, तळागळ्यातील 18 पगड जातीची बूज असलेला नेता म्हणून ज्यांना जाण आहे त्यांना कुणालाही माणवणार नाही. माझ्यासारखी अत्यंत तळागळ्यातून आलेली सामान्य मुलगी असेल हे मला माहिती आहे”, असं सुषमा म्हणाल्या.

“सर कदाचित मी या सभागृहात सांगू शकत नाही की आपण माझ्यासाठी काय केलंय आणि काय नाही. माझं संपूर्ण कुटुंब आज संरक्षिण दिसतंय ते आपल्यामुळे दिसतंय. आपण त्या ताकदीने माझ्या एका फोनवर जेव्हा अनेक नेत्यांनी चार महिन्यांनी मेसेज पाहिला. मी मेसेज टाकल्यापासून आपले स्वीय सहाय्यक सतीश राऊत यांनी अगदी मोठ्या भावासारखा फोन केला आणि आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली”, असं अंधारे म्हणाल्या.

“ज्या क्षणी फोन केला तिथून पुढे सहा तासात मी आपल्यासमोर दिल्लीला हजर होती. आपण म्हणणं ऐकून घेतलं. कुटुंबप्रमुख भेटल्यासारखं स्वत:ला आवरु शकले नाही. मी अक्षरश: आपल्यासमोर रडले. आपण मला तातडीने मुंबईत पाठवलं. पत्र लिहिल्यापासून तासाभरात आपण फोनवर बोललात देखील. पण आम्ही इतके भावनिक होतो की आपण काय म्हणताय हे ऐकूनही घेऊ शकत नव्हतो”, असं अंधारे म्हणाल्या.

‘…म्हणून तुम्ही हवेत’

“आता जे आमदार म्हणून निवडून आलेले लोक आहेत, जे शिंदे गटाचे आहेत, जे बायकांबद्दल इतका हिणकस दृष्टीकोन बाळगतात, इतक्या अश्लाघ्य पद्धतीने बोलतात. बाई म्हणजे पायतली वाहन आहे, अशा पद्धतीने वागतात. वाट्टेल त्या पद्धतीने मग तो सत्तार असेल, शिरसाठ असेल, या सगळ्या लोकांना ज्यांच्यामध्ये प्रचंड मनुवादी दृष्टीकोन वाढलेला आहे यांना सत्तेवरुन खाली खेचायचं असेल तर महाविकास आघाडी असायला हवं. महाविकास आघाडी असेल तर तुम्ही असायला हवं. तुम्ही आहात तर ती मोट बांधून आहे, म्हणून तुम्ही असायला हवं”, अशी भावना सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.