‘…तर त्यांनी निवृत्त व्हावं’, शिवेंद्रराजे भोसले यांचा उदयनराजे यांना टोला

| Updated on: Nov 16, 2022 | 10:12 PM

"आगामी सातारा नगरपालिका निवडणुकीला खासदार उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीने निवृत्ती घ्यावी", असा टोला शिवेंद्रराजेंनी लगावलाय.

...तर त्यांनी निवृत्त व्हावं, शिवेंद्रराजे भोसले यांचा उदयनराजे यांना टोला
Follow us on

सातारा : आगामी सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापत चाललंय. विशेष म्हणजे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती घराण्याचे वंशज आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या पुन्हा आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टीप्पण्याच्या मालिका सुरु होण्याची शक्यता आहे. या मालिकेला शिवेंद्रराजेंनी सुरुवातदेखील केलीय. शिवेंद्रराजेंनी आज शहरातील रस्त्यांवरुन उदयनराजेंवर निशाणा साधलाय. आगामी सातारा नगरपालिका निवडणुकीला खासदार उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीने निवृत्ती घ्यावी, असा टोला शिवेंद्रराजेंनी लगावला.

सातारा नगरपालिकेवर गेल्या पाच वर्षांपासून सातारा विकास आघाडीची सत्ता होती. तर शिवेंद्रराजे यांची नगरविकास आघाडी विरोधी बाकावर बसली होती. पण याच पाच वर्षात सत्ताधाऱ्यांकडून शहरातील साध्या रस्त्यांचंदेखील काम झालं नाही, अशी टीका शिवेंद्रराजेंनी केली.

“मी राहतो किंवा उदयनराजे राहतात त्या परिसरातील रस्त्यांची काय अवस्था आहे? शहरात कशाला, ज्यांच्याकडे नगरपालिका होती त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यांची काय अवस्था आहे?”, असे सवाल शिवेंद्रराजेंनी केले.

हे सुद्धा वाचा

“नुसतंच प्रशासनाकडे बोट दाखवून काही होत नाही. सत्तेत नगरसेवक होते त्यांनीदेखील काम केलं पाहिजे ना”, असं शिवेंद्रराजे म्हणाले.

“आगामी निवडणुकीला सत्ताधारी सगळ्यांनी निवृत्ती घ्यावी. सातारा विकास आघाडीने पुढच्या निवडणुकीला निवृत्ती घ्यावी”, असा टोला त्यांनी लगावला.

“प्रशासनावर लोकप्रतिनिधींचं लक्ष असलं पाहिजे. प्रशासक आला म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही. पाच वर्षे जे सत्तारुढ म्हणून बसले ते आज प्रशासकाकडे बोट दाखवून सगळ्यातून अलिप्त झाले आहेत. हा चुकीचा प्रकार आहे. त्यांनी त्यांची जबाबदारी आजसुद्धा पार पाडली पाहिजे. प्रशासक हे तांत्रिक गोष्टींमुळे आलंय. पण तुमची काही जबाबदारी आहे की नाही?”, अशा शब्दांत शिवेंद्रराजेंनी सुनावलं.