सातारा : “आपण आज काय पाहतोय? जो विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता, त्या विचाराच्या आधारावर सर्व जातीधर्मातील लोकं एकत्र आले. त्यामुळे स्वराज्य मिळालं. स्वराज्य स्थापन झालं म्हणजे आजची लोकशाही. प्रत्येक पक्ष वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, आदर्श मानतात. पण माझ्या मनात एक प्रश्न पडतो, तोच प्रश्न अनेकांना पडतो, ते मलाही विचारतात, सर्वधर्म समभावची व्याख्या बदलली आहे का? खरंच बदलत चालली आहे का?”, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
“सर्वधर्म समभाव म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि आपल्या सोयीचं वेगवेगळ्या धर्मातील लोकांना पोलराईज करायचं काम चाललंय ते कितपत योग्य आहे?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“प्रत्येक जातीधर्माची लोकं प्रत्येक पक्षात असले पाहिजेत. अजेंडा काहीही असलं पाहिजे. जोपर्यंत तुमचा अजेंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांवर जात असेल ते चांगलंय, पण तुम्ही ते आचरणात आणत नाहीत तर मग त्याचा काय उपयोग आहे?”, असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेतात? आधी पाकिस्तान, बांग्लादेश हे भारतात होते. शिवराय असताना हिंदुस्तान अखंडच होता. ज्यावेळी शिवाजी महाराजांची विस्मरण होतं त्यावेळेस काय झालं? पाकिस्तान, हिंदुस्तान, बांग्लादेश वेगळं झालं. असंच चालं राहिलं, प्रत्येकजण व्यक्तीकेंद्रीत विशिष्ट समाजाचा विचार करत राहीलं तर समाजात तेढ तर निर्माण होणारच. पण या देशाचे त्यावेळेस तीन झाले, आता किती तुकडे होतील? प्रत्येक राज्य आता देश होणार आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच देशाला अखंड आणि एकत्र ठेवलं आहे”, असं मत त्यांनी मांडलं.
“मुळात आपण विचार करायला पाहिजे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी या संपूर्ण देशात आणि जगाला लोकशाहीची ढाचा घालून दिला. अजूनही जगभरात असे देश आहेत जिथे राजेशाही आहे. त्यावेळेस त्यांनी विचार केला असता की राजेशाही अबाधित ठेवायची तर आजसुद्धा देशात राजेशाही असती. पण सर्वातप्रथम राज्यकारभारात लोकांचा समावेश व्हावा, वेगवेगळ्या जातीधर्मातील लोकांना न्याय मिळावा, त्यांचं प्रतिनिधित्व असावं, म्हणून त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली ज्याला आपण कॉन्सिलर मिनिस्टर म्हणतो”, असंदेखील ते म्हणाले.
‘त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करा’
“ज्या व्यक्तीने संपूर्ण स्त्रियांचा, वडिलधाऱ्यांचा, प्रत्येक धर्मातील नागरिकांचा, धर्मस्थळांचा सगळ्यांचा सन्मान केला, आज त्यांचाच लेखणी, सिनेमा, वक्तव्यातून अपमान करतंय. हे आज नाही तर चालत आलेलं आहे. आपण सगळ्यांनी गप्प बसायचं का? जेवढे आमदार असतील, तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल, याच राजकारण आणण्याचं कारणच नाही. शिवरायांचं तुम्ही जेव्हा नाव घेता, प्रत्येक चळवळ चालू झाल्या त्यांचं मूळ प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज होते. ज्या लोकांनी वेगवेगळ्या चळवळी केल्या, ते वेगवेगळ्या जातीधर्माची असतील आज त्यांचाही अपमान केला गेला. महापुरुषांच्या विरोधात वादग्रस्त लिहणाऱ्या आणि वक्तव्य करुन अपमान करणाऱ्यांवर राष्ट्रदोहाच्या गुन्हा दाखल केला पाहिजे”, असं उदयनराजे म्हणाले.