सातारा : किल्ले प्रतापगडावर आज 365वा शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिनाचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला छत्रपती घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले उपस्थित नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. या कार्यक्रमाला उदयनराजे का उपस्थित नव्हते? यावर खुद्द उदयनराजे यांनी स्पष्टीकरण दिलंय.
“मला कार्यक्रमाबद्दल कुणी सांगितलं नाही. मी काल रात्रीच पुण्यावरुन उशिरा आलो. मी दोन दिवसांपूर्वी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला. ते आपटून काल माझं काम होतं. ते काम करुन काल रात्री मला घरी यायला उशिर झाला. त्यानंतर आज सकाळी मला पत्रिका मिळाली”, असं उदयनराजेंनी सांगितलं.
“पत्रिका मिळाली म्हणून मला समजलं की कार्यक्रम आहे आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री येत आहेत. नाहीतर मला कुणीच बोललं नाही”, असं उदयनराजे म्हणाले.
यावेळी पत्रकारांनी उदयनराजेंना मुख्यमंत्र्यांनी फोन केला होता का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी “मुख्यमंत्र्यांचाही फोन आला नाही. कुणीच फोन केला नाही. खोटं बोलायचं कारण नाही. उलट याअगोदर मी सांगितलं होतं, ज्यावेळेस सरकार स्थापन झालं त्यावेळेस सांगितलं होतं की, मोठा कार्यक्रम घेऊ”, असं स्पष्ट उत्तर दिलं.
‘हतबल झालेलो नाही, आम्ही हातात बांगड्या घातलेल्या नाहीत’
“परवाच्या दिवशी मला गहिवरुन आलं ते कशामुळे आलं? मी काही हतबल झालेलो नाही. आम्ही हातात बांगड्या घातलेल्या नाहीत. वेळप्रसंगी काय करायचं ते आम्ही ठरवू”, असा इशारा उदयनराजेंनी दिला.
“पण लोकांनी विचार करायला पाहिजे ना. लाज वाटली पाहिजे, एवढं सगळं होत असताना स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. तुम्ही लोकशाहीच्या चार स्तंभातील महत्त्वाचे घटक आहात. तुम्ही त्या लोकांना प्रश्न विचारले पाहिजेत”, असं उदयनराजे म्हणाले.
“राज्यपाल राज्याचा प्रमुख असतो. त्यांनीपण असे विधान करायचे? उद्या आणखी कोणी मोठ्या पदावरचा करेल. तुम्ही खपवून घेणार आहात का?”, असा सवाल त्यांनी केला.
“दोन डोळे माझे आहेत तसे प्रत्येकाचे आहेत. पण संपूर्ण समाज आपल्याकडे बघत असतो. क्षणभर सत्तेत राहण्यासाठी सत्तांतर, मी याला फारसा महत्त्व देत नाही. तुमची भूमिका स्पष्ट करणार आहात की नाही?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“पुढच्या पिढीला आपण काय सांगणार? हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. हे लोकं आज कशासाठी अशाप्रकारे वागतात ते मला माहिती नाही. हळूहळू लोकांना वाटेल की ही फॅशन आहे. ही प्रथाच पडेल. लोकं म्हणतील हे गैर नाहीय. गैर नाहीय म्हणजे? अहो नाव घेऊ नका ना”, असं उदयनराजे भोसले म्हणाले.