उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आम्हाला भीक नको. आम्हाला कष्टाचा पैसा पाहिजे असं शेतकरी म्हणतोय. आमचा हक्क मारून टाकला जात आहे. कोपराला गूळ लावला जात आहे. गुजरातला प्रकल्प जात होते. तेव्हा मिंधे म्हणाले, काळजी करू नका मोदी मोठा प्रकल्प देणार आहे. कुठे आहे प्रकल्प? दिला? मी दौऱ्यावर होतो. काही शेतातील महिलांना विचारलं. त्यांना विचारलं खूश आहे ना. १५०० रुपये मिळत आहेत. ती म्हणाले, १५०० रुपयात घर चालतंय. मुलांना शाळेत कसे घालू. आम्ही त्या महिलेच्या मुलाला शाळेत प्रवेश दिला. त्यांच्या शिक्षणाची सोय केली. पुस्तकांवर जीएसटी. शिक्षणावर जीएसटी. आता आयुर्विम्यावर जीएसटी लावला. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. जाहिरात आहे ना. जिंदगी के बाद भी जीएसटी लावला आहे.’
‘अयोध्येतही जमीन घोटाळा केला. आदर्श सारखा घोटाळा. आमच्या हाती घंटा. तिथे लोढाचा टॉवर. कारसेवकांचं रक्त काय लोढाचं टॉवर बांधायला दिलं होतं. सगळीकडे गुजरातचे कंत्राटदार आहेत. वाराणासीतही शंकराचार्य घरी आले होते. माझं भाग्य समजतो. त्यांनी हिंदुत्वाचा अर्थ सांगितला. जो विश्वासघात करतो तो हिंदुत्ववादी असू शकत नाही. ते संतापले होते. केदारनाथमधील ५०० किलो सोनं गायब झालं. अनेक पुराणकालीन मूर्त्या गायब झाल्या. हे तुमचं हिंदुत्व आहे. अयोध्येतील जमीन लढा खातोय, रामदेवबाबा खातोय. आपण जय श्रीराम करतो. ते केम छो म्हणत आहेत. आपल्याला भाजपमुक्त राम पाहिजे. जो नाही कामाचा तो नाही रामाचा. हे बिनकामाचे लोक आहेत. जाऊ तिथे खाऊ यालाच म्हणतात.’
‘यांची पापं उघडी करावी लागतील. सर्वांच्या यात्रा सुरू आहेत. काल दिल्लीत गेलो. तिथं लोकं भेटली. सर्व जातीपातीचे लोक भेटतात. मुस्लिम, बौद्ध, पारसी ख्रिश्चन आले. सर्व म्हणतात कोरोना काळात तुम्ही जे काम केलं ते विसरू शकत नाही. मी एकट्याने केलं नाही. तुम्ही सर्व होते. त्यामुळे महाराष्ट्र वाचला. आपण गंगेत प्रेतं वाहू दिली नाही. त्यांना वाचवलं. ही कामं लोकांना सांगा. निवडणुकीत कुणी वेडवाकडं बोललं की आपण त्यांना उत्तर देत असतो आणि कामं सांगायला जातो.’