Dada Bhuse School Visit: राज्यातील फडणवीस मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले. त्यानंतर सोमवारी मंत्रालयात जाऊन अनेक मंत्र्यांनी पदभार घेतले. परंतु शालेय शिक्षण मंत्रीपदाची नवीन जबाबदारी मिळालेले दादा भुसे थेट शाळांमध्ये पोहचले. मालेगाव तालुक्यातील शाळांमध्ये त्यांनी अचानक भेटी दिल्या. त्या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांकडून वाचन करुन घेतले. शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. शाळेतील सोयीसुविधांचा आढावा घेतला.
शालेय शिक्षण मंत्री पदाची शपथ घेऊन परतल्यानंतर पहिल्याच दिवशी मंत्री दादा भुसे ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत. मंत्रिपदाचे वाटप झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी शाळांना अचानक दिल्या भेटी दिल्या. शालेय आरोग्य, आरोग्य तपासणी, विद्यार्थी पोषण आहार यांची माहिती घेतली. विद्यार्थी अन् शिक्षकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
शाळांना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अचानक भेटी दिल्या. शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी काम करण्याचे सूतोवाच त्यांनी दिले होते. त्यामुळे शाळा भेटीतून आधी समस्या समजून घेतल्या. मालेगाव तालुक्यातील देवरपाडे गावातील शाळेत ते पोहचले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून वाचन करुन घेतले. कविता म्हणून घेतल्या. मराठी आणि इंग्रजी कविता विद्यार्थ्यांनी म्हटल्या. विद्यार्थी, शिक्षकांच्या समस्या समजून घेतल्या.
शाळेच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दादा भुसे म्हणाले, वर्षभरात संपूर्ण विभागात बदल दिसणार आहे. सर्वच शाळांचा दर्जा सुधारला जाणार आहे. ज्या सुविधा खासगी शाळांकडे आहे, त्या सुविधा आम्ही ग्रामीण भागातील शाळांमध्ये देणार आहोत. इंग्रजी माध्यमांकडे जाणारे विद्यार्थी आमच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी नंबर लावतील. शाळा भेटी दरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आल्याचे दिसून आले आहे. यावेळी काही सोयी, सुविधांची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्या सुविधा येत्या काळात त्यांना देण्यात येईल.
शालेय शिक्षण विभागात रिझल्ट ओरिएंटेड काम दिसणार आहे. शिक्षण विभाग शाळेच्या दारी यापुढे दिसणार आहे. एकंदरीत गरिबातील गरीब विद्यार्थ्याला चांगले शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न आपण सर्व मिळून करू. विद्यार्थी, पालक, संस्था यांना विश्वासात घेऊन काम करू. अनेक गावांतील शाळांचा दर्जा सुधारला आहे. त्यांचे अनुकरण इतर ठिकाणी करण्यात येईल, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे.