मुंबईः जगभरात कोरोनाची तिसरी लाट (corona third wave) सुरु असताना आपल्याकडे शाळा सुरु होतील का नाही, याबाबत साशंकता होती. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज सरसकट शाळा 1 डिसेंबरपासून सुरु (School reopens) होणार, अशी घोषणा केली. त्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. कोरोनाचा धोका असतानाही मुलांना शाळेत येण्याची जोखीम का घेतली जातेय, याचे कारणही गायकवाड यांनी स्पष्ट केलं. गेल्या दोन वर्षांपासून शाळेपासून दुरावलेली मुलं मुख्य प्रवाहात आणणंही तितकंच आवश्यक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळेच पहिली ते दहावी सरसकट शाळा सुरु करण्याचा मोठा निर्णय आज राज्य शासनानं जाहिर केला.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असतानाही शाळा सुरु होण्याची जोखीम का घेतली जात आहे, याचे कारणही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं. दोन वर्षांपूर्वी जी मुलं पहिलीला येणार होती, त्यांनी अद्याप शाळेची इमारतही पाहिली नाही. तसेच पहिली ते चौथी या मुलांना शालेय शिक्षणात एकदम दोन वर्षांचा खंड पडला आहे. त्यामुळे ही मुलं मुख्य प्रवाहाबाहेर फेकली जाऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी तातडीने शाळा सुरु करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांच्या समितीने व्यक्त केले. म्हणूनच राज्य शासनाने हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
राज्यातील आठवीच्या पुढील वर्गातील शाळा सुरु झालेल्या आहेत. मात्र आता पहिलीपासून शाळा सुरु होणार आहेत. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, पहिली ते चौथी वर्गातील मुलांची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे, असा सूर पालकांमधून उमटत आहे. तरीही शाळा सुरु केल्यानंतर मुलांचे आणि पालकांचे योग्य समुपदेशन केले जाईल. किंबहुना मुलांनी बाहेर पडल्यावर किंवा शाळेत कशा प्रकारे काळजी घ्यावी, ही समज पालकांनीच मुलांना द्यायची आहे, असे आवाहनही शालेय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी बोलताना केले.
शाळेसाठीच्या बस सुरु करणे किंवा न करणे हा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. त्यानुसार, संबंधित जिल्ह्यात निर्णय घेतला जाईल. मात्र मुलांना घरातल्याच वाहनाने शाळेत सोडल्यास जास्त फायदेशीर ठरेल, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. स्कूल बस सुरु झाल्यानंतरही बसमध्ये बसण्यासंबंधीची नियमावली जारी करण्यात येईल. तसेच शाळेतल्या वर्गांमध्ये बसणे, शाळेच्या आवारात वावरणे इत्यादी नियमावलीदेखील पुढील आठ दिवसात जारी केल्या जातील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
इतर बातम्या-
Covid Updates: कर्नाटकातील SDM मेडिकल कॉलेज सील, 66 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण