वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप, सुषमा अंधारेंची उडी

| Updated on: Apr 11, 2024 | 10:12 PM

वर्ध्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत रामदास तडस यांच्या सूनेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र हे आरोप ब्लॅकमेलिंगसाठी करत असल्याचं रामदास तडस यांनी म्हटले आहे.

वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप, सुषमा अंधारेंची उडी
ramdas tadas
Follow us on

Wardha : वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्यावर त्यांच्याच सूनेनं गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंसोबत पत्रकार परिषद घेवून पूजा तडस यांनी हे आरोप केले. तर खासदार तडस यांनी हे ब्लॅकमेलिंग असल्याचं म्हणत आरोप फेटाळले आहेत. वर्ध्याचे भाजपचे रामदास तडस यांच्या सूनेनं, तडस कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. तर मुलासोबत प्रेम विवाहातून लग्न झालं. वेगळेही राहिले आणि त्यात मी दोषी कसा ? असा सवाल करत खासदारांनी ब्लॅकमेलिंग असल्याचं म्हटलं आहे.

पत्रकार परिषद घेत आरोप

विशेष म्हणजे तडस यांची सून पूजा तडस यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंसोबत पत्रकार परिषद घेतली. घरातून बेघर केल्याचा थेट आरोप खासदार तडस यांच्यावर त्यांच्या सूनेनं केला आहे.

खासदार तडसांनी आरोप फेटाळले. तर पती पंकज तडस यांनी हनी ट्रॅपमध्ये फसवल्याचा आरोप पत्नी पूजा तडसवर केला आहे. पूजा आणि पंकज तडस यांचं हे प्रकरण अडीच वर्षांआधी उघडकीस आलं होतं. 8 सप्टेंबर 2021 ला पूजा तडस यांचा एका व्हिडीओ तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी ट्विट केला होता. जीवाला धोका असल्याचं सांगणार पूजा तडसचा व्हिडीओ सार्वजनिक झाल्यानंतर त्याच दिवशी पंकज तडस आणि पूजा तडसचा वैदिक विवाह झाला. त्यानंतर पूजा तडसने वर्धा पोलिसात दिलेली तक्रारही मागे घेतली.

पूजाच्या विरोधात कोर्टात धाव

पण आता पंकज तडस पूजाच्या विरोधात कोर्टात गेले असून विवाहच रद्द करण्याची त्यांची याचिकेत मागणी आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट असताना, आणि खासदार तडस यांच्याविरोधात सार्वजनिक वक्तव्य करुन बदनामी करु नये, असा कोर्टाचा लिखीत आदेशही पंकज तडस यांनी दाखवला. त्यामुळं कोर्टाचा अवमान सुषमा अंधारेंनीही केल्याचं सांगत पंकज तडस यांनी अंधारेंविरोधातही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

रामदास तडस यांना भाजपनं पुन्हा वर्ध्यातून उमेदवारी दिली आहे. तर सून पूजाही अपक्ष निवडणूक लढते आहे. त्यातच अंधारेंसोबत पत्रकार परिषदेतून स्फोटक आरोप करुन वर्ध्यातलं राजकारणही तापवलं आहे.