महंत रामगिरी महाराज यांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि इतर ठिकाणी शेकडो नागरीक रस्त्यावर उतरले होते. रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी नाव न घेता निशाणा साधला आहे. “सामाजिक ऐक्याला धक्का बसेल, अशी पावलं टाकली तर तो वारकरी संप्रदायाचा विचार नाही. पिढ्यांपिढ्या एकसंघ राहिलेल्या समाजात छोट्या- मोठ्या प्रसंगातून कटुता झालेली पाहायला मिळते. चुकीच्या प्रवृत्तीला खतपाणी घालणारी लोकं आहेत”, असं शरद पवार म्हणाले.
“समाजाच्या व्यापक हिताचा विचार करणारी लोकं देखील या क्ष्रेत्रात आहेत. त्यांची संख्या कमी असेल. ज्ञानोबा आणि संत तुकाराम यांचे विचार ऐकले. तुकोबांनी आयुष्यभर उपेक्षितांच्या हिताची भूमिका घेतली होती. ढोंगी राजकारण आणि ढोंगी समाजकारण करणाऱ्यांना चोख उत्तर दिलं. समाजाला योग्य दिशेला नेण्याचं काम केलं”, असं शरद पवार म्हणाले.
“मी आज भाषण करायला नाही तर ऐकायला आलोय. निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन आपण कार्यक्रम नाही केले पाहिजे. महत्त्वाची गरज म्हणजे एक समाज तयार व्हायला पाहिजे तो समाज पुरोगामी पाहिजे. वारकरी सांप्रदय म्हणून काम करणारे अनेक लोकं आहेत. त्यांचे विचार ऐकण्याची अनेक वेळा संधी येते. ज्यांच्याकडून समाजात भूमिका घेण्याची अपेक्षा आहे ते जात, धर्म बघून भूमिका घेतात”, असा टोला शरद पवारांनी लगावला.
“समाजाचा विकास करणारा, विचार करणारी लोकं आज सुद्धा आहेत. चुकीच्या प्रवृत्तीला आळा घालण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. अध्यात्मिक आघाडी महत्त्वाची आहे. संत माऊली आणि संत तुकारामांचे विचार आपण ऐकले. तुकाराम महाराज यांनी नेहमी उपेक्षितांच्या विचारांची भूमिका मांडली. देशात एक सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी नामदेव महाराजांचे महत्त्व आहे. पंजाबमध्ये नामदेव महाराज यांचा एक सोहळा आयोजित केला होता. संतांनी लिहलेले धन याचे आपण जतन केलं पाहिजे”, असं शरद पवार म्हणाले.
“पंढरीच्या वारीमध्ये वारकरी कधीही कुठल्या विषयाचा विचार करत नाही. पांडुरंगाचे दर्शन होवो किंवा नाही, नामदेव पायरीचे दर्शन व्हावं ही त्यांची इच्छा असते. तुकाराम महाराज यांचे विचार वाढवण्याची गरज आहे. मी पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जातो. पण मी कधी गाजावाजा करत नाही. त्यांचे दर्शन करायला जातो हे काय जगाला सांगायचं गरज नाही, प्रसिद्धीपेक्षा दर्शन समाधानकारक असतं”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
“मला पोलिसांनी इथे येण्याच्या आधी विचारलं की, तुम्ही जाणार आहेत का? मी म्हटलं हो जाणार आहे. काही लोकांना मी जाणार म्हणून अस्वस्थता जाणवली. पण हे जे लोकं आहेत पांडुरंगाचे खरे भक्त आहेत का? वारीमध्ये जाऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारा खरा वारकरी आहे. पांडुरंगाच्या नावाने व्यावसाय करणाऱ्या घटकांना मी पांडुरंगाचा भक्त मानत नाही”, असं शरद पवार म्हणाले.