महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकालात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. या निवडणुकीत महायुतीच्या झंझावतापुढे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. या पराभवात महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणार २८ चा जादूई आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेता नसणार आहे. त्यावर शरद पवार यांनी १९८० मधील किस्सा सांगितला. शरद पवार म्हणाले, विरोधी पक्षनेता असलेली संख्या विरोधी पक्षाकडे नाही. पण विरोधी पक्षनेता असावा, असे मत व्यक्त केला.
शरद पवार म्हणाले, १९८० रोजी आमचे ५८ आमदार निवडून आले होते. त्यानंतर मी विदेशात गेलो होते. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी आमचे ५२ आमदार फोडले होते. तेव्हा आमच्याकडे फक्त सहा आमदार शिल्लक राहिले. मग आम्ही केवळ ६ आमदार होतो. परंतु आम्ही प्रभावी काम केले. जनतेचे प्रश्न मांडले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विजय मिळवला. आताही विरोधी पक्षाकडे संख्या नसली तरी विरोधी पक्षनेता असायला हवा, असे शरद पवार यांनी म्हटले.
शरद पवार म्हणाले, आमच्या पक्षातून बाहेर गेलेल्या लोकांनी निवडणुका लढल्या. आता त्यांना यश मिळाले आहे. ती सर्व लोक चव्हाण साहेब किंवा गांधी नेहरूंच्या विचाराने काम करणारे होते. परंतु त्यांनी आता संपर्क आणि सहयोग भाजपसोबत ठेवला. दुसरीकडे चव्हाण साहेबांचे आयुष्य पहिल्यावर त्यांनी त्या काळातील जनसंघ आणि भाजपशी कधी संबंध ठेवला नाही. त्यांनी त्यांच्याशी शेवटपर्यंत वैचारिक अंतर कायम राखले, असे त्यांनी म्हटले.
शरद पवार यांनी बारामतीमधील दिलेल्या उमेदवारीवर भाष्य केले. ते म्हणाले, बारामती मतदार संघात उमेदवार देणे आवश्यक होते. त्या ठिकाणी उमेदवारी दिली नसती तर राज्यात काय संदेश दिला गेला असता. बारामतीमधील दोन्ही उमेदवाराची तुलना होऊ शकत नाही. कारण अजित पवार अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. तसेच ते राज्यातील सत्तेतही आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात नवखा तरुण उमेदवार होता, हे आम्हाला माहीत आहे.