नवी दिल्ली | 9 ऑक्टोबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? या मुद्द्यावर आज दुसऱ्यांदा प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने जोरदार युक्तिवाद केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या जात नव्हत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एका सहीने नियुक्त्या करत होते, असा आरोप अजित पवार गटाने केला. शरद पवार घर चालवायचे, तसा पक्ष चालवत होते. त्यांनी नियम पायदडी तुडवले, असा गंभीर आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला. यावेळी अजित पवार गटाच्या वकिलांकडून आणखी एक महत्त्वाची विनंती करण्यात आली. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला 4 वेळा संधी दिलीय. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देऊ नये, अशी विनंती अजित पवार गटाने केली.
अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर शरद पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. यानंतर निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी भूमिका मांडली. मुख्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी अजित पवार गटाची विनंती फेटाळत शरद पवार यांच्या गटाला मोठा दिलासा दिला. निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली. तसेच या प्रकरणी आता अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झालाय. पुढच्या सुनावणीवेळी शरद पवार गटाकडून युक्तिवाद केला जाईल. पुढची सुनावणी 9 नोव्हेंबरला होईल, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.
निवडणूक आयोगातील सुनावणी पार पडल्यानंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप केला. “राष्ट्रवादीच्या प्रकरणावर सुनावणी झालीय. याचिकर्त्यांचा युक्तिवाद संपलाय. तीन व्यक्तींनी त्यांच्याकडून युक्तिवाद केलाय. आम्हाला युक्तिवादासाठी 9 नोव्हेंबरचा वेळ दिलाय”, अशी माहिती अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली.
“याचिकाकर्त्यांकडून घाई केली जात होती. त्याबाबत निवडणूक आयोगाने ताशेरे ओढले. आमचा अजून युक्तिवाद सुरु झालेला नाही. आम्हाला 9 हजार प्रतिज्ञापत्र त्रुटी आढळल्या आहेत. या सुनावणीला लवकर संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच आमच्या युक्तिवादाला वेळ न देण्याचा याचिकाकर्त्यांचा प्रयत्न होता, पण त्यांचा तो प्रयत्न निवडणूक आयोगाने धुडकवून लावलाय”, अशी प्रतिक्रिया अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली.
निवडणूक आयोगातील पुढची सुनावणी जास्त महत्त्वाची असणार आहे. कारण पुढच्या सुनावणीवेळी शरद पवार यांच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाणार आहे. अजित पवार गटाच्या वकिलांकडून प्रभावीपणे युक्तिवाद करण्यात आलाय. त्यामुळे अजित पवार गटाच्या युक्तिवादाला पुराव्यानिशी खोडून काढणं हे शरद पवार गटाच्या वकिलांसाठी चॅलेंज असणार आहे. शरद पवार गटाचा युक्तिवाद प्रभावी ठरला तर निकाल कदाचित त्यांच्या बाजूने लागू शकतो. त्यामुळे त्यांच्या युक्तिवादाला जास्त महत्त्व आहे.