EC hearing on NCP Symbol | शरद पवारांसमोर निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद, कुणी कुणाचे दावे फेटाळले?

| Updated on: Nov 09, 2023 | 6:25 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर निवडणूक आयोगात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी शरद पवार यांच्या गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष युक्तिवादाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या युक्तिवादाला उत्तर दिलं. निवडणूक आयोगात जवळपास दोन तास युक्तिवाद चालला. त्यानंतर निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबरपासून पुढची सुनावणी होईल, असं जाहीर केलं.

EC hearing on NCP Symbol | शरद पवारांसमोर निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद, कुणी कुणाचे दावे फेटाळले?
Follow us on

नवी दिल्ली | 9 नोव्हेंबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. गेल्या सुनावणीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात होता. अजित पवार गटाकडून शरद पवार गटावर गंभीर आरोप करण्यात आले होते. शरद पवार हे पक्षात हुकूमशाही राबवायचे. ते त्यांच्या मनाला पटेल त्या पदाधिकाऱ्यांची परस्पर नियुक्ती करायचे. तसेच त्यांची पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद बेकायदेशीर होतं, असा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांकडून करण्यात आला होता. अजित पवार गटाच्या या युक्तिवादावर शरद पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला.

शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सलग दोन तास युक्तिवाद केला. त्यानंतर निवडणूक आयोगाने पुढील सुनावणी 20 नोव्हेंबरला होईल, अशी माहिती दिली. या सुनावणीनंतर अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “सलग सुनावणी व्हावी अशी आमची मागणी होती. 20 तारखेनंतर सलग सुनावणी होणार आहे. काही तांत्रिक गोष्टी आम्ही कोर्टासमोर आणणार आहोत. त्यावर कोर्ट सुनावणी करतील”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.

अजित पवार गटाचे हजारो प्रतिज्ञापत्र खोटी?

शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनीदेखील सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “निवडणूक आयोगात जवळपास दीड तास सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत आम्ही पहिल्यांदा युक्तिवादाला सुरुवात केली. यावेळी आम्ही अनेक धक्कादायक, आश्चर्यकारण आणि अजब गोष्टींमागचे तथ्य निवडणूक आयोगासमोर मांडले. याचिकाकर्त्यांनी जे मुख्य दस्ताऐवज निवडणूक आयोगात दाखल केले होते, त्यापैकी आम्ही 20 हजार असे प्रतिज्ञापत्र शोधून काढले आहेत, त्यापैकी 8900 प्रतिज्ञापत्रांचा चार्ट बनवून निवडणूक आयोगाला दिला”, अशी माहिती अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली.

“अनेक प्रतिज्ञापपत्रे ही खोटी, बनावट आहेत. मृत्यू झालेल्यांचे देखील प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलांचेदेखील प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहेत. तर काही प्रतिज्ञापत्रांमध्ये जे पदं लिहिण्यात आले आहेत ती पदं कधी पक्षातच नव्हते. काही प्रतिज्ञापत्रांमध्ये गृहिणी म्हणून असा उल्लेख आहे. आम्ही अशा 24 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिज्ञापत्रांची यादी केली आहे. हे सर्व खोटी प्रतिज्ञापत्र आहेत”, असा आरोप अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.

‘सत्याचा विजय होईल’

“अजित पवार यांच्याकडे कोणतंच समर्थन नाही. याबाबतचा युक्तिवाद 20 नोव्हेंबरपासून सुरु होईल. पण आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केलीय की, हे इतकं गंभीर आहे, त्यावर कायदेशीर कारवाई करावी. खोटी माहिती दिल्या प्रकरणी कठोर कारवाई करावी. सत्याचा विजय होईल, अशी मला आशा आहे”, अशी प्रतिक्रिया अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली.

शरद पवार गटाकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आलं?

  • अजित पवार गटाकडून बोगस कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. जमा केलेल्या शपथपत्रांमध्ये अनेक सदस्यांचा मृत्यू झालाय.
  • अजित पवार गटाची 2 हजार पेक्षा अधिक प्रतिज्ञापत्रे खोटी आहेत
  • अजित पवार गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये काही मृत पदाधिकाऱ्यांचे नाव आहे
  • शिवसेनेच्या सुनावणीवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र ग्राह्य न धरता निकाल देण्यात आल्याचं निदर्शनास आलंय. शिवसेनेसारखी वागणूक आम्हाला देण्यात येऊ नये. आमची प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरण्यात यावी.
  • शरद पवारच पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत शरद पवारांना अधिकार देण्यात आले होते. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचं पत्र देताना अजित पवार यांचंही अनुमोदन होतं.