NCP Hearing | ‘अजित पवार गटाकडून मृत व्यक्तींचे कागदपत्रे सादर’, सुनावणीनंतर वकिलांचा मोठा दावा

| Updated on: Oct 06, 2023 | 6:40 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? या मुद्द्यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली. यावेळी अजित पवार गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. अजित पवार गटाने अनेक महत्त्वाचे मुद्दे मांंडले. त्यावर शरद पवार गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आलीय.

NCP Hearing | अजित पवार गटाकडून मृत व्यक्तींचे कागदपत्रे सादर, सुनावणीनंतर वकिलांचा मोठा दावा
Follow us on

नवी दिल्ली | 6 ऑक्टोबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? या मुद्द्यावरुन महत्त्वाची सुनावणी पार पडली. निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हावरची आजही पहिली सुनावणी होती. या सुनावणीत दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या सुनावणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या बाहेर पडले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असताना धक्कादायक माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने जो दावा केला तो चुकीचा आहे. अजित पवार गटाने सादर केलेले प्रतिज्ञापत्र चुकीचे आणि खोटे आहेत. त्यामध्ये मृत व्यक्तींच्या प्रतिज्ञापत्रांचा समावेश असल्याचा दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.

दोन तास युक्तिवाद झाला. निवडणूक आयोगासमोर आम्ही स्पष्ट सांगितलं की, तुम्ही आमचं ऐकून न घेता पक्षात फूट पडल्याचं निश्चित केलंय. आधी आमचं म्हणणं ऐकून घेऊन ठरवा. आम्ही आधीपासून प्राथमिक विरोध केलाय. निवडणूक आयोगाने हा विरोध प्राथमिक मानू शकत नाही, असं म्हटलंय. पण याचिकाकर्त्यांची भूमिका मांडल्यानंतर तुमचं सर्व म्हणणं ऐकलं जाईल, असं आश्वासन निवडणूक आयोगाने दिलंय, अशी प्रतिक्रिया अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली.

‘मृत पावलेल्या व्यक्तीचे कागदपत्रे निवडणूक आयोगात सादर’

आम्ही अजून युक्तिवाद केलेला नाही. कुणीही चुकीच्या कागदपत्रांचे आधारे पक्षावर दावा करु शकत नाही. मृत पावलेल्या व्यक्तीचे कागदपत्रे आहेत, काही जण वेगळ्या पक्षाचे आहेत ते पक्षाचे आहेत, असं दाखवलं आहे. हे काल्पनिकपणे पक्षाला तोडण्याचा प्रयत्न केला गेलाय. पक्षाच्या घटनेपासून याचिकाकर्ते लांब पळत आहेत, असं अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं.

‘सोमवारी अजित पवार गटच युक्तिवाद करणार’

याचिकार्त्यांनी फक्त लोकप्रतिनिधींचं बहुमत पाहा, असं म्हटलंय. पण सुप्रीम कोर्टाने ते मानलेलं नाही. त्यांनी दावा केलाय की, आमच्या लोकप्रतिनिधींना मिळालेल्या मतांचा विचार करा. पण आज पक्ष जो आहे, ज्याने पक्ष बनवला, राष्ट्रवादीचा चेहरा माझ्यासोबत उभा आहे. इतर लोक चुकीची माहिती देत आहेत. ज्याने पक्ष बनवला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही, असं मत अभिषेक मनु सिंघवी यांनी मांडलं. तसेच पुढची सुनावणी ही येत्या सोमवारी होणार आहे. त्यादिवशी देखील अजित पवार गटाला भूमिका मांडण्याची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर आम्हाला वेळ दिला जाईल, असं अभिषेक मनु सिंघवी  यांनी सांगितलं.