संदीप राजगोळकर, Tv9 प्रतिनिधी, नवी दिल्ली | 7 फेब्रुवारी 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हाबाबत सुरु असलेल्या सुनावणीवर महत्त्वाचा निकाल दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हं बहाल केलं आहे. तर शरद पवार गटाला आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तीन नव्या नावांचा आणि चिन्हांचा प्रस्ताव देण्याचा आदेश दिला होता. निवडणूक आयोगाने यासाठी आज संध्याकाळी चार वाजेपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार शरद पवार गटाकडून तीन नावांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये पहिलं नाव हे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, दुसरं नाव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, तिसरं नाव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदराव पवार असं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजे शरद पवार गट एका चिन्हासाठी जास्त आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वटवृक्ष या चिन्हासाठी शरद पवार गट आग्रही आहे. आता निवडणूक आयोग याबाबतच्या मागणीवर काय भूमिका घेतं ते पाहणं जास्त महत्त्वाचं असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाला शरद पवार गटाने आतापर्यंत फक्त तीन नावे सूचवली आहेत. राज्यसभेसाठी चिन्हाचा वापर होत नाही. पण आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार गटाचं काय चिन्हं असेल ते देखील महत्त्वाचं आहे. कालपर्यंत उगवत्या सूर्याचं चिन्ह असेल अशी चर्चा सुरु होती. पण सूत्रांनी आता या प्रकरणी मोठी अपडेट दिली आहे. शरद पवार गट आता वटवृक्ष चिन्हासाठी आग्रही आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मोठं आव्हान असणार आहे. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा होते. त्यांनी पक्षाची स्थापना केली. त्यांनी पक्ष वाढवला. पण तरीदेखील त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. शरद पवार गटाकडे लोकप्रतिनिधींची संख्या कमी आहे. अजित पवार गटाकडे आमदारांचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाला मेहनत घ्यावी लागणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीपाठोपाठ महाराष्ट्रात पुढच्या सहा महिन्यांनी विधानसभेचीदेखील निवडणूक असणार आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्राची जनता कोणाच्या बाजूने निकाल देते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.