मुंबई: पहाटे सहा वाजल्यापासून आपला दिनक्रम सुरू करून कार्यकर्त्यांना भेटणारे, त्यांच्या समस्या जाणून घेणारे आणि त्यांचे प्रश्न तिथल्या तिथे तातडीने सोडवणारे राष्ट्रवादीचे (ncp) सर्वेसर्वा शरद पवार सर्वांना माहीत आहेत. वयाच्या ऐंशीव्या वर्षीही झंझावाती प्रचार दौरे करणारे, तरुणांनाही लाजवेल असे भरपावसात सभा घेणारे शरद पवारही (Sharad Pawar) सर्वांना माहीत आहेत. त्याशिवाय दुष्काळ असो की भूकंप, वादळ असो की पूरस्थिती प्रत्येक ठिकाणी स्वत: जाऊन परिस्थितीची पाहणी करून आपत्तीग्रस्तांचे अश्रू पुसणारेही पवार माहीत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदापासून ते केंद्रातील संरक्षण आणि कृषी मंत्रीपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेल्या शरद पवारांचा आता आणखी एक साधेपणा समोर आला आहे. देशातील अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेले व्हीव्हीआयपी (vvip) नेते असतानाही पवार विमानतळावर सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभे राहिलेले दिसले. त्यामुळे पवारांचा साधेपणा लोकांसमोर आला आहे. पवारांचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून या फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे.
शरद पवार हे देशातील मोठं नाव आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील पवार हे प्रमुख दावेदार आहेत. देशातील अनेक नेते पवारांचा सल्ला घेत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मी पवारांचं बोट पकडून राजकारणात आल्याचं विधान केलं होतं. मात्र, देशातील एवढे महत्त्वाचे नेते असूनही पवारांनी नेहमीच साधेपणा जपला आहे. कोणताही बडेजाव त्यांनी ठेवला नाही. मागे ठाणे जिल्ह्यात ते एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी पवारांनी कार्यकर्त्याच्या झोपडीत जेवणाचा अस्वाद घेतला होता. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. आता पवारांचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
आज सकाळी शरद पवार दिल्लीला निघाले होते. त्यासाठी मुंबई विमानतळावर आले होते. युके 970 मुंबई ते दिल्ली फ्लाईटच्या बोर्डिंगवेळी पवार रांगेत सर्वसामान्यांप्रमाणे उभे असल्याचं पाहायला मिळालं. दिल्ली विमानतळावर बोर्डिंगची भली मोठी रांग लागलेली होती. पवार या रांगेत उभे असल्याचं दिसतं. त्यांच्या हातात पेपर असून तोंडाला मास्क लावल्याचं दिसतं. त्यांच्या मागे आणि पुढे काही लोक उभे असल्याचंही दिसतंय. विशेष म्हणजे पवार काचेचा आधार घेत बोर्डिंगच्या रांगेत उभे होते. कोणताही बडेजाव न करता आणि व्हीआयपी संस्कृती बाजूला ठेवून पवार सर्वसामान्यांसारखे रांगेत उभे असल्याचं पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. एकीकडे व्हीआयपी असल्याचं सांगून विमान लेट केल्याच्या अनेक बातम्या वाचायला ऐकायला मिळत असतानाच पवारांच्या या साधेपणाने अनेकांची मने जिंकली आहेत.
संबंधित बातम्या: