मुंबईः शरद पवार (Sharad Pawar) हे हवेत गप्पा मारणारे नेते नव्हेत. हे यशवंतरावानंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे दृष्टे नेतृत्व आहे, अशा शब्दांत रविवारी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. शरद पवारांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त राऊत माध्यमांशी भरभरून बोलले.
81 वर्षांचा तरुण
राऊत म्हणाले की, 81 वर्षांनंतरही पवार एखाद्या तरुणासारखे सक्रिय आहेत. जनतेशी थेट संवाद असलेले, हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील असे काम करणारे नेते म्हणजे पवार आहेत, असे कौतुक त्यांनी केले. पवार हे सर्वात अनुभवी आणि लोकप्रिय नेते आहेतच. त्यांनी कृषी, संरक्षण क्षेत्रात ठोस पावले उचलली. महाराष्ट्राने देशाला जी काही नेतृत्व दिली, त्यात यशवंतरावानंतर शरद पवार आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग शरद पवारांशिवाय शक्य नव्हता, याचा पुनरुच्चाही त्यांनी यावेळी केला.
मुंडे यांना युती कळाली
गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती. राऊत यांनी मुंडे यांच्यावरही कौतुकाचा वर्षावर करत भाजपवर शरसंधाण साधले. ते म्हणाले, भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे पुन्हा एकदा एका नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. आता यावर भाजपमधून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागेल.
शरद पवार हे हवेत गप्पा मारणारे नव्हेत. यशवंतरावानंतर महाराष्ट्राला लाभलेले हे सर्वात मोठे दृष्टे नेतृत्व आहे. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या सारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळली होती. बहुजन समाजाच नेतृत्वाची सुरुवात त्यांनीच केली.
– संजय राऊत, शिवसेना नेते