मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यभर चर्चेत असलेले आणि आरोप-प्रत्यारोपाची राळ उडवून देणारे भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या यांच्याशी संबंधी आएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरणावर आज पहिल्यांदाच शरद पवारांनी (Sharad Pawar) थेट सवाल उपस्थित करत, ही रक्कम पक्षाकडे का दिली, असा प्रश्न केला. शिवाय असे करणे आक्षेपार्ह असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. किरीट सोमय्या यांनी देशद्रोहासारखा गुन्हा केल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 2013-14 आणि 2014-15 साली देशाच्या संरक्षण दलाचा अभिमान असलेली आयएनएस विक्रांत भंगारात काढण्याची तयारी सुरू होती. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी भाजपाचा झेंडा घेऊन सेव्ह विक्रांत नावाने मोहीम सुरू केली. लाखो-करोडो मुंबईकरांकडून कोट्यवधी रुपये जमा केले. मात्र, या रकमेचे पुढे काय झाले? आयएनएस विक्रांत तर भंगारात गेली. त्यावेळी 57 कोटी रुपये अशी ही रक्कम सांगण्यात आली होती. प्रत्यक्षात 100 कोटींपेक्षा जास्त रक्कम किरीट सोमय्या यांनी स्वतःच्या घशात घातली, हा देशद्रोहाचा गुन्हा आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यावरून सध्या राजकारण आणि न्यायालयीन लढाईही पेटलीय.
किरीट सोमय्या यांच्या आयएनएस विक्रांत प्रकरणावर शरद पवार म्हणाले की, पैसे गोळा केले हे आता दिसतंय. ते केले असतील तर त्याचा विनियोग काय केला. मला त्याची माहिती नाही. माझ्या वाचनात हे पैसे पक्षाकडे दिले असं आलं. हे खरं आहे का. याचा अर्थ एक रुपया असो 11 हजार असो की 50 कोटी असो. ज्या कामासाठी पैसा गोळा केले, लोकांच्या भावनेला हात घातला. तो निधी पक्षाकडे का दिला. आर्मफोर्स, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्सलाही हा पैसा दिला गेला असता. मात्र, तिथे दिला नाही. माझ्या मते हे आक्षेपार्ह आहे.
शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा संपवणारा पक्ष आहे, असं ते म्हणतात. त्याची नोंद महाराष्ट्रातील लोकांनी घेतली. त्यामुळे लोकांनी त्यांना एकही जागा दिली नाही. त्यांच्या सभा मोठ्या होतात. त्यात शिवराळपणाची भाषा असते. नकला असतात. करमणूक होते म्हणून लोक जातात, असा चिमटाही त्यांनी यावेळी राज यांना काढला. पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत चौफेर टोलेबाजी केली. आता त्यांना मनसे आणि भाजपमधून कोण उत्तर देणार याची उत्सुकता आहे.