Ajit pawar and Sharad Pawar: राज्यात महायुतीचे सरकार दणदणीत बहुमताने सत्तेवर आले. सरकारकडे २३० आमदार असल्यामुळे विरोधी आमदारांची संख्या नगण्य राहिली आहे. त्यामुळे काही विरोधी आमदार सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे एकमेव आमदाराने अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे.
वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. आमदार पठारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट होताच राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आमदार पठारे यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, अजित दादा यांच्या या भेटी दरम्यान मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात चर्चा केली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही, असा दावा त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर बापू पठारे हे शरद पवार यांच्या गटात राहिले. विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तिकीट देण्यात आले. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांचा पराभव केला. पुणे जिल्ह्यातून शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेले हे एकमेव यश होते. विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला केवळ दहा जागांवर विजय मिळाला. दुसरीकडे अजित पवार यांनी दमदार कामगिरी केली. त्यांच्या पक्षाला ४१ जागांवर यश मिळाले.
बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला अपयश आले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनीच बाजी मारली. पुण्यातील दहापैकी पाच ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी, अशी थेट लढत झाली होती. त्यामध्ये पाचही जागा अजित पवार यांनी जिंकल्या. त्यामुळे अजित पवार यांनी आपणच पुणे जिल्ह्याचे दादा आहोत, हे दाखवून दिले होते.