महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालेलं आहे. पण असं असलं तरीही महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार मुख्यमंत्रीपदासाठी भाजपची अडवणूक करतील का? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी भूमिका मांडली. “भाजपकडे इतका मोठा आकडा आहे. त्यामुळे त्यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून संघर्ष होईल असं वाटत नाही. त्यांच्या नादाला कोणी लागेल असं वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. त्यांनी निवडणूक काळातील वचननाम्याची आठवण यावेळी काढली. “बहिणीला पुढचा हप्ता कधी मिळेल याची वाट पाहतील. विजेचं बिल कधी माफ होईल याची लोक वाट पाहतील. पदवीधरांना ४ हजार रुपये कधी मिळतील याची लोक वाट पाहतील”, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार आज कराडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. “विरोधी पक्षनेता असलेली फिगर विरोधी पक्षाकडे नाही. पण विरोधी पक्षनेता असावा. १९८० मध्ये आमचे ५२ आमदार गेले. तेव्हा विरोधी पक्षनेता नव्हता. आम्ही ६ आमदार होतो. पण आम्ही प्रभावी काम केलं आणि निवडणूक जिंकली. राज्याला विरोधी पक्ष नव्हता ही पहिलीच वेळ नाही. १९८० मध्ये देखील तशी परिस्थिती झाली होती. दोन-तीन वेळा झाली होती. नंतर त्यावेळी दोन-तीन पक्ष एकत्र येऊन विरोधी पक्षनेता बनवू शकत होते. एकदा मी होतो, एकदा निहाल अहमद आणि मृणालताई गोरेही विरोधी पक्षनेते होते”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
“अजितदादांच्या जागा जास्त आल्या आहेत. हे अमान्य करण्याची गरज नाही. पण राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे, हे महाराष्ट्राला माहीत असावं”, असं शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. “आमच्या सर्व सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कष्ट खूप केले. त्यात अडचण नाही. प्रमुख नेत्यांनी खूप कष्ट केले. तरीही हा निर्णय आला. त्यात लाडकी बहीण, धार्मिक अंडर देण्याचा प्रयत्न काही प्रवृतीने केला त्याचाही परिणाम असावा. एक चर्चा केली जाते की, समाजातील काही घटकांनी मतदानात वेगळा दृष्टीकोण घेतला असं म्हणतात. मला माहीत नाही. आम्ही त्या खोलात जाणार आहोत”, असं शरद पवार यांनी सांगितलं.