राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देण्यात आला होता. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. “भाजपने वोट जिहाद भूमिका मांडली. त्यातून धार्मिक ध्रुवीकरण करण्यात आलं असं म्हणता येईल. एकदम नकार देता येत नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. तसेच “भाजपकडे इतका मोठा आकडा आहे. त्यामुळे त्यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून संघर्ष होईल असं वाटत नाही. त्यांच्या नादाला कोणी लागेल असं वाटत नाही. लोक बहिणीला पुढचा हप्ता कधी मिळेल याची वाट पाहतील. विजेचं बिल कधी माफ होईल याची लोक वाट पाहतील. पदवीधरांना ४ हजार रुपये कधी मिळतील याची लोक वाट पाहतील”, असा टोला शरद पवारांनी यावेळी लगावला.
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:
- “जी माहिती आम्ही लोकांकडून कार्यकर्त्यांकडून घेत आहे, लाडक्या बहिणीचा मुद्दा लोकांकडून ऐकायला मिळतो. हा एक महत्त्वाचं कारण आहे. प्रत्यक्ष महिलांच्या खिशात काही रक्कम देण्यात आली. त्याचा प्रचार हाही करण्यात आला, दोन अडीच महिन्याची रक्कम आता देत आहोत. त्यांनी सांगितलं की, आम्ही सत्तेत नसलो तर ते बंद होतो. हे बंद होईल याची चिंता महिलांना झाली. त्यामुळे या महिलाांनी आमच्या विरोधात मतदान केलं हे प्राथमिक दिसतं”, असं शरद पवार म्हणाले.
- “लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारची भूमिका जनतेने घेतली. त्यात थोडसं आम्हाला लोकांचा अधिक विश्वास होता. त्या अधिक विश्वासामुळे जेवढं आक्रमक रितीने या कँपेन करण्याचा प्रयत्न केला. त्यापेक्षा अधिक आक्रमक प्रचार करण्याची गरज होती”, असं स्पष्ट मत शरद पवारांनी यावेळी मांडलं.
- “ईव्हीएमबाबत मी काही सहकाऱ्यांचं मत मी ऐकलं. पण त्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही. तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही. यापूर्वी कधी झालं नव्हतं असं पैशाचं वाटप झालं असं लोक सांगतात”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया शरद पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली.
- शरद पवारांनी झारखंडमधील काँग्रेसच्या यशावरही प्रतिक्रिया दिली. “तिकडचे काही सहकारी सांगत होते. एक आणखी एक अँगल त्याला काही लोक सांगतात. चार महिन्यापूर्वी एक निवडणूक झाली. हरियाणा, जम्मू काश्मीर. त्यात जम्मू काश्मीरमध्ये भाजपविरोधातील लोकांना यश आलं. हरियाणा भाजपकडे गेली. त्यानंतर दुसरी निवडणूक झाली. महाराष्ट्र ठरलेल्या महिन्यापेक्षा एक महिना लेट केली. ती झारखंडसोबत केली. झारखंडमध्ये काँग्रेसला यश आहे. इथे अपयश आहे. त्यामुळे एक लहान राज्य यशासाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांच्या कामासाठी. असा काही तरी गंमतीचा चेंज दिसतो. उद्या कोणी मशिनचा आरोप करायला नको. त्या राज्यात तुमचं राज्य आलं ना, तेव्हा हीच मशीन होती”, असा टोला शरद पवारांनी लगावला.