प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 17 फेब्रुवारी 2024 : एखाद्या संघटनेची खूण आपण काढून घेतली तर त्या संघटनेचं अस्तित्व संपल नाही, असं काही होत नाही. कोणी गेलं तरी आपण आपले विचार सोडायचे नाहीत, विरोधकांची जागा आपण लोकशाही मार्गाने दाखवू शकतो, असे सांगत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना धीर देत नव्याने लढण्याची उमेद दिली. माझ्या वयाची चिंता करू नका, असे सांगत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे सोपवलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांच्या गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला .
मात्र असे असेल तरी शरद पवार यांनी अजूनही उमेद सोडलेली नाही. बारामती येथे ते बोलत होते. ‘राजकारणात पक्ष उभे राहतात, काही पक्ष सोडून जातात. नवे येतात, असं होत असतं. एखादी व्यक्ती गेली म्हणजे संपूर्ण पक्ष गेला, असं नाही. (पक्षाच्या) चिन्हाची काळजी करायची नसते. चिन्ह काढून घेतलं म्हणजे संघटनेच अस्तित्व संपेल अस कधी होत नसतं. सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे ‘ असा सल्ला शरद पवार यांनी दिला.
देशात पहिल्यांदा अस घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्ष काढून घेतला आणि चिन्ह पण काढून घेतला. हा निर्णय कायद्याला धरून आहे असं वाटत नाही. म्हणूनच आपण सुप्रीम कोर्टात गेलो आहोत त्याचा निकाल लवकरच लागेल, असंही ते म्हणाले.
चिन्हाची काळजी करू नका
चिन्हाची काळजी करायची गरज नसते. मी १४ निवडणूक लढलो. ५ वेळा निवडणूक चिन्ह वेगळं होत. चिन्ह काढून घेतलं की पक्ष संपला असं होत नाही. आपण कायम सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. नवीन चिन्ह पोहोचायला वेळ लागणार नाही. ज्या मतदार संघात काम करतो तिथे मला ही निवडून दिलं होतं. तो मतदारसंघ मला चांगला ठाऊक आहे. तुम्ही सगळ्यांमी काम केलं तर एक चांगला अनुकूल निकाल घेऊ. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. लोकांना विश्वास धीर द्या यश नक्की मिळेल, असं शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.