जालना | 1 सप्टेंबर 2023 : जालन्यात आज मोठी घटना घडली आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून भीषण लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. जालन्याच्या या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निषेध व्यक्त केला आहे. जालन्याच्या या घटनेवरुन त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. गृहमंत्र्यांची भावना पोलिसांच्या कृतीतून व्यक्त झालीय, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तसेच संबंधित घटना शांत व्हावी, त्यासाठी आंदोलकांना तिथे जावून धीर द्यावं लागेल, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी गृहमंत्र्यांवर निशाणा साधला.
“मला जालन्यातून एक-दोन लोकांचे फोन आले. तिथे काय घडलं हे सांगितलं. तिथे मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते. पोलिसांनी मनोज जरांगे यांच्याशी विचार विनिमय केला. त्या चर्चेत सर्व शांततेने झालं होतं. पण चर्चेनंतर पोलीस बळाचा वापर करुन त्यांना तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यात त्या तरुणांवर प्रचंड लाठीहल्ला केला”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली.
“एकदा तुम्ही चर्चा केल्यानंतर लाठीहल्ला करण्याची काही आवश्यकता नव्हती. पण हल्ली विशेषत: सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रश्नांसंबंधित कोणताही प्रश्न असले तर ते रस्त्यावर आले तर बळाचा वापर ही राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मनात काही घटकांबद्दल मनामध्ये जी भावना असेल ती भावना पोलिसांच्या कृतीतून व्यक्त होत असते. ते व्यक्त झालेले चित्र आपण जालन्यात पाहिले”, असं शरद पवार म्हणाले.
“त्यामध्ये पोलिसांना काय दोष द्यायचा. याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारची, गृह खात्याची जबाबादारी घेणाऱ्यांची आहे, मी याचा तीव्र निषेध करतो. हे थांबवण्यासाठी त्या लोकांना तिथे जाऊन धीर द्यावं लागेल”, असं शरद पवार यांनी सांगितलं. दरम्यान, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
“अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला. शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल”, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला.
“मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल”, असं संभाजीराजे म्हणाले.