शरद पवार गटाला मदत करणाऱ्यांना अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे मामा यांनी दम दिला आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी याबाबतची माहिती जाहीरसभेत दिली. आम्हाला मदत करणाऱ्यांना दमदाटी करण्यात आली. शेतात पाणी सोडणार नाही म्हणून दम दिला गेला आहे. अरे मामा, जरा जपून. तुला सरळ करायला वेळ लागणार नाही, असा दमच शरद पवार यांनी दत्तात्रय भरणे मामा यांना भरला. इंदापूरमध्ये झालेल्या जाहीरसभेतून शरद पवार यांनी हा इशारा दिला.
इंदापुरात एक वेगळी स्थिती आहे. तुमच्या सामुदायिक शक्तीने सत्ता हातात आल्यावर इंदापूरचा विकास होईल. पण इथल्या एका आमदाराकडून दमदाटी सुरू आहे. इथल्या एका व्यक्तीला मी आमदार केलं. मी मंत्री केलं होतं. तीच व्यक्ती लोकांना दमदाटी करत आहे. काही लोक माझ्याकडे आले. त्यांनी सांगितलं की, आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे. पण ते दमदाटी करत आहेत. आम्हाला तुमच्या पक्षाला सहकार्य करायचं आहे. पण आम्हाला सांगण्यात आलं की या लोकांना सहकार्य केलं तर तुमच्या शेतीचं पाणी बंद करू. मोठी गंमतीशीर गोष्ट आहे. शेतीचं पाणी यांच्या बापजाद्यांची इस्टेट नाही. मी त्यांना एवढंच सांगू शकतो, अरे मामा जरा जपून. तुला सांगतो हे लक्षात ठेव, तुला सरळ करायला वेळ लागणार नाही, असा इशाराच शरद पवार यांनी दिला.
तुझ्यासाठी काय केलं नाही? तुझ्यासाठी काय गोष्टी केल्या नाहीत? गुजरातमधून औषध कंपनीच्या एजन्सी त्यांना हव्या होत्या. मी त्यांना आणून दिल्या. आणखी काही दुकानांसाठी मदत पाहिजे होती ती दिली. लहान समाजातील लोक येतात. त्यांना उभं करण्यासाठी पाठिंबा देणं गरजेचं असतं. ती भूमिका मी घेतली. त्याचा परिणाम असा झाला त्यांचे पाय जमिनीवर राहिले नाही. त्यांचे पाय हवेत आहेत. त्यांचं डोकं हवेत आहे. त्यांना एवढंच सांगू इच्छितो, या तालुक्यात कुणीही सत्तेचा वापर करू नये. तुम्हाला कुणी दमदाटी करत असेल तर त्यांना जागा दाखवा. सत्ता आणि सत्तेचा माज उतरवण्यात वेळ लागत नाही, असं शरद पवार म्हणाले.
ही निवडणूक देशाची आहे. देशाला नवीन दिशा आणि रस्ता दाखवणं आवश्यक आहे. त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. देशात अनेक पक्ष आहेत. त्यापैकी भाजप हा एक पक्ष आहे. त्यांच्या हातात देशाचं राज्य आहे. आमचा प्रयत्न हा आहे की, त्यांना देशाचा अधिकार दिल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने पावलं टाकली, निर्णय घेतले त्यामुळे समाजातील मोठा वर्ग अस्वस्थ आहे. त्यामुळे देशाचं राजकारण योग्य दिशेने आणण्यासाठी आम्ही विचार करत आहोत. विविध पक्षाच्या लोकांना आम्ही एकत्र केलं. इंडिया नावाचं नवं संघटन काढलं. त्यानंतर परिस्थिती बदलायला लागली, असं पवार म्हणाले.
आज केरळमध्ये भाजप नाही. डाव्या पक्षाचं राज्य आहे. तामिळनाडूत भाजप नाही. आंध्रप्रदेशात भाजपचं राज्य नाही. अनेक राज्य आहेत, त्या ठिकाणी भाजप नाही. राज्य आहे कुठं? तर महाराष्ट्रात आहे. गुजरातमध्ये आहे. मध्यप्रदेशात आहे. राजस्थानात आहे. उत्तर प्रदेशात त्यांचं राज्य आहे. आसाममध्ये त्यांचं राज्य आहे. त्यांचं इतर ठिकाणी राज्य नाही. या पार्श्वभूमीवर लोकसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे की, जनतेच्या सुखदुखाशी समरस होणारी नीती घेऊन देशाचा कारभार करण्याची गरज आहे. ती यशस्वीपणे करायची असेल तर भाजपचा पराभव केल्याशिवाय गत्यंतर नाही, असंही त्यांनी सांगितलं.