मुंबई : महाराष्ट्र हा नेहमीच सर्वात आधी छत्रपती शिवरायांचा (Chatrapati Shivaji Maharaj) आहे, पण शरद पवार छत्रपतींचं नाव न घेता आपल्या सभांमध्ये शाहू फुले आंबेडकरांचंच नाव घेतात, असा थेट आरोप राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्टीकरण दिलं. फुले शाहू आंबेडकरांचं मी नाव घेतो, याचा मला अभिमान आहे. पण शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रासाठीचं योगदानही मी मानतो. दोनच दिवसांपूर्वी मी अमरावतीतलं भाषण मागवून घेतलं. शिवाजी महाराजांचं योगदान या विषयावर मी 25 मिनिटं बोललो आहे. त्यात मी अनेक गोष्टी सांगितल्या. पण कोण काय बोलंलंय, हे वृत्तपत्र न वाचताच वक्तव्य करणाऱ्यांचं असं होतं, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
छत्रपती शिवरायांचं नाव शरद पवार का घेत नाही, या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी दोन मुद्दे सादर केले. एक म्हणजे त्यांनी अमरावतीत दोन दिवसांपूर्वी केलेल्या भाषणाचा उल्लेख केला. हे भाषण मी काही वेळापूर्वीच मागवून घेतलं असून त्यात मी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रासाठीच्या योगदानावर पंचवीस मिनिटे बोललो आहे, त्यात मी अनेक गोष्टी सांगितल्याचे पवारांनी सांगितले. दुसरा मुद्दा सांगताना पवार म्हणाले, ‘ माझ्या भाषणात फुले शाहू आंबेडकर यांचाच उल्लेख केला जातो. त्याचा मला अभिमान आहे. या राज्यात शिवाजी महाराजांबाबत सविस्तर वृत्त काव्यात पहिल्यांदा कोणी लिहिलं असेल तर ते फुल्यांनी लिहिलं. आंबेडकर , शाहू आणि फुले हे शिवाजी महाराजांवर आस्था असणारे घटक आहेत. महाराजांचा आदेश लक्षात घेऊन आपल्या हातातील सत्तेचा वापर कसा करावा याची भूमिका त्यांनी मांडली. त्यांचा उल्लेख करणं म्हणजे शिवाजी महाराजांचा विचारच मांडणं आहे, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं.
शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून जातीपातीचं राजकारण करतात, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. यावर पुढे स्पष्टीकरण देताना शरद पवार म्हणाले, ‘ पुरंदरेंबाबत मी बोललो असेन. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना जिजामातेनं शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व घडवलं हे सांगण्याऐवजी दादाजी कोंडदेव यांनी योगदान दिलं असं सांगितलं. त्याला माझा सख्त विरोध होता. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व हे राजमाता जिजामातेने कष्टाने उभं केलं. त्या व्यक्तिमत्त्वाचं मोठेपण या पदापर्यंत पोहोचायला कुणाचं योगदान होतं तर ते जिजाऊंचं होतं. पण पुरंदरेंनी त्याबाबत वेगळं मत मांडलं. ते योग्य नव्हतं. ते माझं मत आजही आहे. तेव्हाही होता.
इतर बातम्या-