शरद पवारांचा जागा दाखवून देण्याचा इशारा, हसन मुश्रिफांनी खेळलं अल्पसंख्याक कार्ड

| Updated on: Sep 04, 2024 | 10:58 PM

कागलमधून शरद पवारांनी हसन मुश्रिफांना जागा दाखवून देण्याचा इशारा दिला. त्यानंतर, मुश्रिफांनी अल्पसंख्याक कार्ड खेळलं आहे. माझ्यासारख्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्याच्या मागं शरद पवार का लागलेत, अशी टीका मुश्रिफांनी केली आहे.

शरद पवारांचा जागा दाखवून देण्याचा इशारा, हसन मुश्रिफांनी खेळलं अल्पसंख्याक कार्ड
Follow us on

शरद पवार साहेब माझ्यासारख्या अल्पसंख्याक कार्यकर्त्याच्या मागे का लागले?. समजत नाही असा थेट निशाणा मंत्री हसन मुश्रिफांनी शरद पवारांवर साधला आहे. समरजित घाटगेंच्या पक्षप्रवेशाच्या सभेतून थेट कागलमधून शरद पवारांनी मुश्रिफांना जागा दाखवण्याचा इशारा दिला. त्यानंतर मुश्रिफांनी अल्पसंख्याक कार्ड बाहेर काढलं. मुश्रिफांनी अल्पसंख्याक वरुन शरद पवारांना घेरलं. तर जितेंद्र आव्हाडांनी महायुतीच्याच नितेश राणेंच्या वक्तव्यावरुन मुश्रिफांवर हल्लाबोल केला. मशिदीत घुसून मारण्याची धमकी नितेश राणेंनी दिली तेव्हा का बोलले नाहीत, असा सवाल आव्हाडांनी केला.

अल्पसंख्याक हा शब्द वापरुन मुश्रिफांनी शरद पवारांनाच टार्गेट केल्यानं, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सोशल मीडियावर मुश्रिफांना आतापर्यंत काय काय मिळालं, याची यादीच व्हायरल केली जातेय. 5 वेळा आमदार, 4 वेळा मंत्री, वक्फ बोर्ड, कोल्हापूर जिल्हा बँकेतील सत्ता,
महानगर पालिकेतील सत्ता, जिल्हा परिषद, पंचायत समिती, साखर कारखाने. विशेष म्हणजे हे तेच हसन मुश्रीफ आहेत, जे राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर दादांसोबत येण्याआधी शरद पवारांचं भरभरुन कौतुक करायचे. माझ्यासारख्या अल्पसंख्याक कार्यकर्त्याला पवारांनी किती पाठिंबा दिला हे सांगताना मुश्रीफांना अश्रू अनावर व्हायचे.

कागलमध्ये मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे अशी थेट लढत होणार आहे..भाजपला सोडचिठ्ठी देवून तुतारी हाती घेताच, घाटगेंनी दिवारचा डायलॉग मारत, माझ्यासोबत शरद पवार आहेत, असं म्हटलं होतं. त्यावरुन मुश्रिफांनी अब तेरी खैर नहीं असं प्रत्युत्तर दिलं आहे.

एकेकाळी शरद पवारांचे खंदे समर्थक अशी ओळख हसन मुश्रिफांची होती..पण अजित पवारांच्या बंडानंतर मुश्रीफांनी शरद पवारांची साथ सोडली. आता कागलमध्ये उमेदवार जरी समरजित घाटगे असले तरी मुश्रिफांचा अप्रत्यक्ष सामना शरद पवारांशीच असेल.