दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसेना संघर्ष शिगेला, सदा सरवणकरांचे पोस्टर्स शिवसैनिकांनी फाडले, 5 शिवसैनिकांना जामीन, सरवणकरांविरोधात गुन्हा

| Updated on: Sep 11, 2022 | 3:11 PM

सरवणकर यांच्याविरोधात आर्म्स एक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे. अटक केलेल्या पाच शिवसैनिकांवरील कलम ३९५ मागे घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात येते आहे. दरम्यान या पाच जणांना जामीन मंजूर झाल्याची माहिती आहे. 

दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसेना संघर्ष शिगेला, सदा सरवणकरांचे पोस्टर्स शिवसैनिकांनी फाडले, 5 शिवसैनिकांना जामीन, सरवणकरांविरोधात गुन्हा
संघर्ष शिगेला
Image Credit source: TV 9 marathi
Follow us on

मुंबई – शिंदे गट (Eknath Shinde group)आणि उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group)यांच्यात संघर्ष शिगेला पोहचला आहे. सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांना शुभेच्छा देणारे दादर आणि माहिम परिसरातील पोस्टर्स शिवसैनिकांनी फाडले आहेत. सरवणकर यांच्या संपर्क कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली आहे. गणपती विसर्जनापासून सुरु झालेला हा वाद आणखी विकोपाला गेलेला आहे. शिवसेनेचे नेते पोलीस स्टेशनामध्ये पोहचले आहे. काल दादरमध्ये प्रभादेवीत झालेल्या राड्याप्रकरणी ५ शिवसैनिकांना मुंबई पलिसांनी अटक केली आहे. तर काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले होते. सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शंदे यांनी केला होता, मात्र सरवणकर यांनी हे आरोप फेटाळले होते. अखेरीस शिवसेना नेत्यांनी दादरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिल्यानंतर सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी सरवणकर यांच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली आहे.

सरवणकर यांच्याविरोधात आर्म्स एक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे. अटक केलेल्या पाच शिवसैनिकांवरील कलम ३९५ मागे घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात येते आहे. त्यांची सुटका करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येते आहे. दरम्यान या पाच जणांना जामीन मंजूर झाल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

आजच्या पोस्टर फाडण्याच्या घटनेनंतर अद्याप सरवणकर गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काल रात्री नेमके काय घडले ?

अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवीत सरवणकर समर्थक आणि शिवसैनिक समोरासमोर आले होते. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने त्यावेळी हा संघर्ष टळला, मात्र शनिवारी पुन्हा या वादाचे पडसाद उमटले होते. प्रभादेवीत शनिवारी रात्री शिंदे गट आणि शिवसैनिक आमनेसामने आले आहे. यावेळी सरवणकर समर्थक आणि शिवसैनिक यांच्यात राडा झाला. त्यावेळी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे. या राड्यात शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना मारहाण करण्यात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रभादेवीत झालेल्या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टचा जाब विचारण्यासाठी शिवसैनिक त्या ठिकाणी पोहचले होते.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी काय घडले ?

प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसैनिक गणपती विसर्जन मिरवणुकीत आमने सामने आले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी ५० खोके, एकदम ओके अशा घोषणा करण्यात आल्या. तर शिंदे गटाकडून म्याव म्यावच्या घोषणा करण्यात आल्या. त्यानंतर वातावरण तापले, पोलिसांनी मध्यस्थी केल्याने हा प्रकार अखेरीस थांबवण्यात आला होता.