शिर्डी : शिर्डी नगरपंचायतीला नगरपरिषद करण्यासाठी अनेक दिवस प्रयत्न सुरू होते, त्यासाठी कोर्टात लढा सुरू होता. तर दुसरीकडे नगरपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्यावर ग्रामस्थांसह, नेत्यांनीही निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नगरपंचायत निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ही अधिसूचना सरकारने काढली आहे. ३० दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती घेण्यास मुदत देण्यात आली आहे.
शिर्डी नगरपंचायत होणार नगरपरिषद
शिर्डी नगरपंचायत आता नगरपरिषद होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नेत्यांसह, ग्रामस्थांकडून ही मागणी होत होती. त्यांच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. लोकसंख्या निकष लावत नगरपंचायतची नगरपरिषद करण्याची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. याबाबत राज्य शासनानाने अधिकृतरित्या अधिसूचना काढली आहे. पण नगरपंचायतीची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ही अधिसूचना काढल्यानं आता नगरपंचायत निवडणूक रद्द होणार का? याकडेही लक्ष लागले आहे.
नेत्यांनी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार
ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी ग्रामस्थांनी आणि नेत्यांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. तसेच औरंगाबाद उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर 7 डिसेंबरला सुनावणी होणार होती, मात्र त्याआधीच शिर्डीकरांची मागणी मान्य झाली आहे.
सुजय विखेंनी घेतल्या उमेदवारांच्या मुलाखती
ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमदरांच्या मुलाखती भाजप खासदार सुजय विखेंनी घेतल्या होत्या. यावेळी जवळपास 300 इच्छुक उमदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या किती मोठी आहे हे दिसून येतं, त्यामुळे यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.