शिर्डी : 7 ऑक्टोबर 2023 | देशभरातील दुसरे तर महाराष्ट्रातील सर्वधिक श्रीमंत समजल्या जाणाऱ्या शिर्डीच्या साई संस्थानाने एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला होता. दर्शन रांग कॉम्प्लेक्स दुमजली आहे. यामुळे भाविकांना एकाच छताखाली सर्व सुविधा मिळणार आहेत. दर्शन रांगेत तासनतास उभे राहण्यापासून भक्तांची सुटका होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दर्शन रांग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यात येणार होते. पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळत नाही. त्यामुळे दर्शन रांग अद्यापही सुरू झालेली नाही. मात्र, दर्शन रांग आता सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शिर्डी साई संस्थानने देशभरात साईमंदिर निर्माणासाठी 50 लाखांचा निधी देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावाला शिर्डीकरांनी विरोध केलाय. शहरात असुविधा असताना हा निर्णय घेण्यात येऊ नये अशी भूमिका शिर्डी ग्रामस्थांनी घेतलीय. तर, या प्रस्तावाविरोधात माजी नगराध्यक्षा अनिता जगताप आणि त्यांचे पती विजय जगताप यांनी आमरण उपोषण सुरू केलंय.
माजी नगराध्यक्षा अनिता जगताप यांचे दोन दिवसांपासून उपोषण सुरु आहे., नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यांनी उपोषणस्थळी भेट दिली. साईबाबा संस्थानचा कारभार औंरगाबाद उच्च न्यायालयाने नेमलेली समिती पाहत आहे. त्यामुळे कोणताही धोरणात्मक नियम किंवा निर्णय हा न्यायालयाच्या परवानगी नंतरच होतो. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मांडलेल मत हे त्यांचे व्यक्तिगत असू शकतं असं विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.
पालकमंत्री विखे पाटील यांच्या यशस्वी मध्यस्तीनंतर जगताप दांम्पत्यांनी दोन दिवस सुरू असलेले उपोषण मागे घेतले. यावेळी बोलताना विखे पाटील यांनी 109 कोटी रूपये खर्चून बांधलेले अत्याधुनिक दर्शनरांग कॉम्प्लेक्स लवकरच सुरू होईल असे सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून साईभक्तांसाठी नवीन दर्शन कॉम्प्लेक्स बांधून तयार झालंय. परंतु, उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळत नाही. त्यामुळे दर्शन रांग अद्यापही सुरू झालेली नाही. मात्र, येत्या दसऱ्यापासून ही दर्शन रांग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळाली तर ऑनलाईन पद्धतीने तारीख घेण्याचा प्रयत्न करू. जर त्यांची तारीख मिळाली नाही तर दर्शन रांग भक्तांसाठी सुरू करून नंतर लोकार्पण सोहळा करता येईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दर्शन रांग सुरू करण्याची मागणी केली होती. थोरात यांच्या पत्रानंतर अवघ्या काही तासातच येत्या दसऱ्याला दर्शन रांग सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे पुन्हा एकदा आजी- माजी महसूल मंत्र्यांमध्ये श्रेयवादाची लढाई आगामी काळात दिसून येईल हे नक्की.