Shirur Loksabha election : शिरुर लोकसभेचा सामना जवळपास फिक्स झाला आहे. महाविकासआघाडीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगणार असणार आहेत तर त्यांच्याविरोधात महायुतीकडून अजित पवारांच्या चिन्हांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शिवाजी आढळराव पाटील उभे राहणार आहेत. त्यामुळे चुरस वाढली आहे.
शिरुरमध्ये महायुतीचा उमेदवार कोण यावरुन बरीच शोधाशोध सुरु होती. दरम्यानच्या काळात अभिनेते नाना पाटेकर यांचंही नाव चर्चेत आलं होतं. अमोल कोल्हेंविरोधात शिवाजी आढळराव पाटील हेच उमेदवार योग्य असं एकमत झालंय, पण यंदा आढळराव शिवसेनेच्या
चिन्हाऐवजी अजित पवारांच्या गटात प्रवेश करुन घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. त्यावरुन आढळराव पाटील यांना चौथ्या पक्षप्रवेशाच्या शुभेच्छा देत अमोल कोल्हे यांनी टोला लगावला आहे.
शिवाजी आढळराव पाटील हे 90 सालापर्यंत राष्ट्रवादीत होते. 2004 च्या निवडणुकीत खासदारकीसाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 3 वेळा खासदार राहिल्यानंतर 2019 ला राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंकडून आढळराव पाटील पराभूत झाले होते. 2022 ला आढळराव ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत गेले. आणि आता 2024 ला महायुतीत आढळराव अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन लोकसभा लढवू शकतात.
आढळराव पाटील यांनी जर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तर आपण घरी बसू असा इशारा खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी दिला होता., कारण खेडचे मोहिते आणि आढळराव एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. आता मात्र नाराजी दूर झाल्याचं त्यांनी म्हटले आहे.
2019 ला राष्ट्रवादीच्या कोल्हेंविरोधात शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील लढले. त्यामुळी अमोल कोल्हे यांना 6,35,830 मते तर आढळराव पाटील यांना 5,77,347 मतं पडली होती. कोल्हेंनी 58,483 मतांनी आढळरावांचा पराभव केला होता. 2019 च्या शिरुर लोकसभेतील विधानसभानिहाय मतदान पाहिल्यास राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे जुन्नर, आंबेगाव, खेड-आनंदी आणि शिरुरमधून आघाडीवर होते.
शिवसेनेच्या आढळरावांना भोसरी आणि हडपसर या दोन ठिकाणी लीड होतं.
महायुतीत शिरुरची जागा शिवसेनेची असली तरी यंदा उमेदवार त्यांचा, मात्र चिन्ह अजित पवारांच्या घड्याळाचं असणार आहे. पण चिन्ह वा पक्षप्रवेश या गोष्टी दुय्यम असून आपण महायुतीचे उमेदवार आहोत., असं शिवाजी आढळराव पाटलांचं म्हणणं आहे.