मुंबई : अधिवेशनाचा पहिला दिवस शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या नक्कलेनं गाजल्यानंतर दुसऱ्या दिवसाची सुरूवात भाजप आमदार नितेश राणेंच्या आदित्या ठाकरेंवरील नक्कलेनं झाली. आदित्य ठाकरे विधानसभेमध्ये येत असताना नितेश राणेंनी म्याव म्याव अशा घोषणा देत राणे विरुद्ध शिवसेना संघर्षाच्या नव्या अंकाची जणू सुरूवातचं केली. नितेश राणे नुसते घोषणाबाजीवर थांबले नाहीत. तर वाघाची आता मांजर झालीय अशी बोचरी टीका करत जाणीवपूर्वक म्याव म्याव केल्याचंही स्पष्ट केलं. म्याव म्याव अध्यायावर थांबतील ते राणे कसले. त्यानंतर आदित्या ठाकरेंना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवरून देखील नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचलं.
अधिवेशनातील वादास कारण की…
आता राणें आदित्य ठाकरेंवर एवढ्या टोकाच्या टीकेवर पोहोचण्याचं कारण म्हणजे नितेश राणेंविरोधात दाखल झालेल्या दोन पोलीस तक्रारी. एका व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपात कणकवली पोलिसांनी नितेश राणेंना चौकशीची नोटीस बजावलीय. तर मुंबईत राणीबागेचं नाव बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावल्याच्या नितेश राणेंच्या ट्विटवरून शिवसैनिकांनी मलबार हिल पोलीसात तक्रार केलीय. सभागृहाबाहेर सुरू झालेल्या राणे V/S शिवसेना वादाचे पडसाद अगदी सभागृहातही पाहायला मिळाले. प्रश्नोत्तर तासावेळी नितेश राणे आणि मंत्री अनिल परब यांच्यात जोरदार घमासान झालं.
धमकी प्रकरण, एसआयटी चौकशीची मागणी
एका बाजूला नितेश राणे विरूद्ध शिवसेना सामना तापलेला असतानाच विधानसभेत आमदार सुनील प्रभूंनी आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीचा मुद्दा मांडला. त्यानंतर हेच आदित्य ठाकरेंच्या धमकीचं प्रकरण सनातन, कर्नाटक कनेक्शन पासून ते अगदी अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणापर्यंत पोहोचलं. त्यातच मंत्री नवाब मलिकांनीही धमकी प्रकरण सनातनशी जोडून एसआयटी चौकशीची मागणी केली. राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष महाराष्ट्राला काही नवा नाही.मात्र ऐन अधिवेशनकाळात आदित्य ठाकरेंना डिवचल्यानं हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.